मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कडक सूचना जारी केल्या आहेत. मराठी-अमराठी वादाने राज्यात वातावरण तापले असताना आता राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून स्पष्ट आदेश दिला आहे.
कोणत्याही कार्यकर्त्याने किंवा नेत्याने त्यांच्या परवानगीशिवाय वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या किंवा डिजिटल माध्यमांशी संवाद साधू नये. तसेच, सोशल मीडियावर व्यक्तिगत प्रतिक्रिया किंवा व्हिडीओ शेअर करू नयेत. पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनाही राज ठाकरे यांच्या परवानगीशिवाय माध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात तणावाचे वातावरण आहे. मीरा भाईंदर येथे मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद अधिकच पेटला. मनसे आणि भाजपच्या काही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पक्षाला शिस्तबद्ध ठेवण्यासाठी आणि गैरसमज टाळण्यासाठी हा कठोर आदेश जारी केला आहे. यापूर्वी ५ जुलै रोजी वरळी येथील मेळाव्यातही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मराठी भाषेच्या वादात मारहाणीचे व्हिडीओ बनवू किंवा शेअर करू नये, असे बजावले होते.
राज ठाकरे यांचे आदेश काय?
राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे, “पक्षातील कोणीही वृत्तपत्रे, वाहिन्या किंवा डिजिटल माध्यमांशी बोलू नये. स्वतःचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू नयेत. प्रवक्त्यांनीही माझ्या परवानगीशिवाय माध्यमांशी संवाद साधू नये.” हा आदेश पक्षातील सर्व स्तरांतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना लागू आहे. यामुळे मनसेची रणनीती आणि पुढील पावले याबाबत उत्सुकता वाढली आहे.
एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 8, 2025





