Narayan Rane – मुंबईत सोमवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी या प्रकरणी एका पत्रकार परिषदेद्वारे महायुती सरकारवर टीका केली. या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख त्यांनी भ्रष्टनाथ असा केला. यासंबंधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही खडेबोल सुनावले. त्यानंतर काही वेळातच नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार करत त्यांना अमित शहांवर टीका करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा इशारा दिला. राणे म्हणाले, तुम्ही अमित शहा यांचे नाव घेऊ नका. अन्यथा अडचणीत सापडाल. संजय राऊत यांच्या नादी लागू नका. ते काही महात्मा नाहीत. ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले होते. आता त्यांनी जणू काही मोठ्या संग्रामात जाऊन आल्यासारखे पुस्तक लिहिले आहे. त्याचे काय कौतुक? संजय राऊत तुरुंगात का गेले? हे पाटकर बाईंना विचारा. राणेंनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये. त्यांच्या परदेशातील गुंतवणुकीची माहिती माझ्यापर्यंत येत आहे. अभिनेता डिनो मोरियाच्या कितीतरी कंपन्या आहेत. केतन कदम मिठी नदी प्रकरणात अटकेत आहे. या कदमचे डिनो मोरियाशी काय संबंध आहेत? माझ्याकडे 1985 पासूनचे हिशोब आहेत. एकनाथ शिंदे गप्प बसतात. पण आता त्यांनी मातोश्रीपर्यंत पोहोचवलेले आपले पोते काढावे. त्यांनी तसे केले तर उद्धव व आदित्य ठाकरे यांचा आवाज बंद होईल. एकनाथ शिंदे निष्ठावान होते म्हणून काम करत होते. दोन्ही पवार एकत्र आले तर आमचा फायदाच गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरही नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. शरद पवार कुणासोबतही जास्त टिकत नाहीत. ते अजित पवार यांच्यासोबत आले तर साहजिकच आमचा फायदा होईल. आमचा पक्ष मोठा आहे. आम्ही ठरवू काय आणि कसे करायचे, असे ते म्हणाले.