फीसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबवू नका

पुणे – करोना संकटामुळे पालकांनी फी न भरली नाही. यावर काही शाळा विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबवत आहेत. दरम्यान, शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी सर्व माध्यमांच्या शाळांना दिला आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंदच ठेवण्यात आल्या असल्या, तरी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. करोनामुळे सतत करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच शाळांकडून विद्यार्थ्यांकडे फी वसुलीचा तगादा लावण्यात येतच आहे. फी न भरल्यामुळे शाळांकडून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबवण्यात येत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश विटकर यांनी केल्या होत्या.
माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित सर्व शाळांना त्यांनी नुकतेच पुन्हा आदेश बजावले आहेत.





