गळती थांबेना! आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई – शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. बहुतांश आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली. शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेतील गळती काही केल्या थांबत नसून आज आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी जाऊन हा प्रवेश सोहळा पार पडला.
आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील युवा सैनिक आणि शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने आदित्य यांना हा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीच्याही काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. विक्रोळीहून राष्ट्रवादीची ईशान्य मुंबई जिल्हा संघटक सिंड्रेला प्रभू गवळी यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह आज शिंदे गटात प्रवेश केला. विक्रोळीच्या जनतेचा अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे महात्मा फुले महापालिका रुग्णालय गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे. आश्वासन देऊनसुद्धा हॉस्पिटलचे पुनर्निर्माण होत नव्हते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सदर हॉस्पिटलची पाहणी करून लवकरात लवकर हॉस्पिटलच्या कामाला शुरुवात होणार, असे आश्वासन दिले. म्हणून आज शिंदे गटात पक्ष प्रवेश केला असल्याचे सिंड्रेला प्रभू गवळी यांनी सांगितले.




