तमिळांच्या भाषेशी खेळू नका : कमल हासन

चेन्नई : तमिळ लोकांनी त्यांच्या भाषेसाठी आपले प्राण गमावले आहेत. त्या गोष्टींशी खेळू नका. तमिळ लोकांना, अगदी मुलांनाही, त्यांना कोणती भाषा हवी आहे, हे त्यांना चांगले माहित आहे. त्यांना कोणती भाषा हवी आहे, हे निवडण्याची बुद्धी त्यांच्याकडे आहे, असे प्रतिपादन अभिनेता, राजकारणी कमल हासन यांनी केले आहे. कमल हासन यांनी शुक्रवारी त्यांच्या पक्षाच्या मक्कल निधी मय्यम (एमएनएम) च्या ८ व्या स्थापना दिनानिमित्त चेन्नईमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि भाषिक अभिमानाचे महत्त्व अधोरेखित केले.
स्थापना दिनानिमित्त, हसन यांनी चेन्नईतील एमएनएम मुख्यालयात पक्षाचा ध्वजही फडकावला. कमल हासन यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरील टीकेची कबुली दिली. विरोधक त्यांना अपयशी राजकारणी म्हणतात. तथापि, त्यांच्या प्रवासाचा विचार करताना, हासन यांनी कबूल केले की, कदाचित ते राजकारणात उशिरा आले असावेत.
कमल हासन यांनी आपल्या भाषणात तमिळ लोकांसमोरील आव्हानांवर प्रकाश टाकला. विशेषतः त्यांनी तमिळ भाषेबद्दल खूप चिंता व्यक्त केली. त्यांनी हिंदी लादण्याविरुद्ध तामिळनाडूच्या ऐतिहासिक संघर्षाचा उल्लेख केला आणि भाषेच्या मुद्द्यांना हलके समजणाऱ्यांना इशारा दिला.
आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना, हासन यांनी एमएनएमच्या आगामी राजकीय महत्त्वाकांक्षेकडे लक्ष वेधले आणि म्हटले की या वर्षी पक्षाचा आवाज संसदेत ऐकू येईल आणि पुढच्या वर्षी तो राज्य विधानसभेत जाणवेल. त्यांनी त्यांच्या समर्थकांना २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.





