ICC Women’s T20 World Cup 2024 : संयम राखून दबावावर मात करावी – डायना एडलजी

ICC Women’s T20 World Cup 2024 :- कर्णधार हरमनप्रीत कौर व भारतीय संघाने पुढील महिन्यात होणाऱ्या महिला विश्वकरंडक टी-20स्पर्धेततून करंडकाचा दुष्काळ संपवावा. स्पर्धेत असलेला दबावाच्या परिस्थितीमध्ये संयम राखून दबावावर मात करावी, असा सल्ला भारताची माजी कर्णधार डायना एडलजी यांनी दिला.
सन 2020 च्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभूत व्हावे लागले होते. भारताने विश्वकरंडक स्पर्धेत अजून एकदाही विजेतेपद मिळालेले नाही. मात्र, ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल सहा वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यावर बोलताना एडलजी म्हणाल्या, ऑस्ट्रेलिया एक व्यावसायिक संघ असून ते केवळ जिंकण्यासाठी खेळतात. आपण देखील ऑस्ट्रेलिया संघाप्रमाणेच केवळ जिंकण्यासाठी खेळणे आवश्यक आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीलंकेविरुद्ध खेळताना चामारी अथापथुथू आणि हर्षिता समरविक्रमाने या डावखुऱ्या फलंदाजानी अर्धशतके झळकावून भारताला पराभूत करताना आशिया करंडकावर आपली मोहोर लावली होती. डावखुरे फलंदाज येतील आणि चौकार षटकार मारून विजय घेऊन जातील, असे कुणालाच वाटले नव्हते. मात्र अशा वेळी तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवून काम करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
भारतीय संघ चांगला आहे, मात्र विजय मिळवून खेळ संपविण्याकडे लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे. कोणत्याही विरोधी खेळाडूला संघाला विजयाकडे घेऊन जाण्याची संधी देऊ नये, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
तिला भावनांवर नियंत्रण ठेवावे लागणार
भारतीय महिला संघाला विश्वकरंडक स्पर्धेत विजय मिळवायचा असल्यास कर्णधार हरमनप्रीत कौरला महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. ती चांगली खेळाडू असून स्वतःच्या ताकदीवर ती खेळ जिंकू शकते हे तिने सिद्ध करून दाखविले आहे. मात्र मैदानावर तिला भावनांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे, असा सल्ला भारताची माजी कर्णधार डायना एडलजी यांनी दिला.





