“खचू नका, वेडवाकडं पाऊल उचलू नका,” उद्धव ठाकरेंकडून पुरग्रस्त भागाची पाहणी, शेतकऱ्यांना दिला धीर

Uddhav Thackeray | दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे ओळखला जाणाऱ्या मराठवाडयात आज सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. मराठवाड्यात महापुराने धुमाकूळ घातला आहे. यात शेतीचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकऱ्याचा संसार उघडयावर आला आहे. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याने आता उभं तरी कसं राहायचं असा सवाल उपस्थित राहिला आहे.
सध्या सत्ताधारी आणि विरोधक देखील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला व शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.
आज उद्धव ठाकरेंनी लातूरच्या काटगाव या ठिकाणी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या हाती काही नाही. मात्र, धीर देण्यासाठी आलो असल्याचे सांगत खचू नका, वेडवाकडं पाऊल उचलू नका, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो अशी साद शेतकऱ्यांना घातली.
‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करा’
“शेतकरी संकटात सापडला आहे. आम्ही सरकारकडून जी मदत तातडीने हवी आहे ती आम्ही मिळवून देऊ. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत केली जावी आणि कर्जमुक्ती करावी या मागणीसाठी आम्हीही आग्रही राहू. तातडीची मदत सरकारला देऊ द्या त्यानंतर बाकीच्या गोष्टीही आपण पाहू. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचीही मागणी आम्ही करणार आहोत,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. Uddhav Thackeray |
‘जाहीर केलेली मदत तुटपंजी’
सरकारने जाहीर केलेली मदत 2023 च्या निकषांप्रमाणे असून नुकसान पाहता जाहीर केलेली मदत तुटपंजी आहे. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना साथ सोबत करण्यासाठी आपण आलो असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर साहेब आमची कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी केली. यावेळी आपल्याला मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आणि पंचनामे करताना अधिकारी आडमुट्टी भूमिका घेत असतील तर आपण सोबत असल्याचा धीर देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. Uddhav Thackeray |
दरम्यान, एका दिवसात उद्धव ठाकरे पाच जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर धाराशिवसाठी रवाना झाले. उद्धव ठाकरे हे धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणीही जाणार आहेत. Uddhav Thackeray |
हेही वाचा:





