Chandrakant Patil : ‘नादाला लागू नका, एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू;’ चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना थेट इशारा
Chandrakant Patil : महायुतीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते तथा माजी मंत्री सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Chandrakant Patil : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता महायुतीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते तथा माजी मंत्री सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“देवेंद्र फडणवीस हे तेल लावलेले पैलवान आहेत. त्यांच्या नादाला लागू नका, अन्यथा एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना दिला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
‘बंटी आहेत, बंटी साहेब नाहीत’
कोल्हापुरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “लहान मुलाला एखादे खेळणे मिळाले नाही की ते जसा त्रागा करते, तसाच प्रकार सध्या सुरू आहे. त्यांच्या या बालिश वागण्यामुळेच लोकांनी ओळखले आहे की हे ‘बंटी’ आहेत, ‘बंटी साहेब’ नाहीत.” पुढे ते म्हणाले, “राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर माणूस समजदार असावा लागतो. केवळ स्वतःची टिमकी वाजवून मुख्यमंत्री होता येत नाही.”
डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीवरही प्रश्न
चंद्रकांत पाटील यांनी डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीवरही प्रश्न उपस्थित केले. “एकेकाळी डी. वाय. पाटील स्कूटरवरून फिरत होते. आज एवढी अफाट संपत्ती कुठून आली? याचे उत्तर त्यांनी द्यावे. हे सर्व स्वतःसाठी मलाई काढण्याचे काम सुरू आहे. तुम्ही स्वतः काचेच्या घरात राहता, त्यामुळे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारणे थांबवा. आपली उंची पाहून बोला,” अशा शब्दांत त्यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली.
गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या आक्रमक टीकेला सतेज पाटील काय प्रत्युत्तर देतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





