Kirit Somaiya : किरीट सोमय्या पक्षाच्या निर्णयावर नाराज; पक्षाने दिलेली ‘ती’ जबाबदारी नाकारली

मुंबई : भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर किरीट सोमय्या हे प्रचंड संतापले आहेत. ‘मला न विचारता नियुक्ती का केली,’ असे त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी नाकारली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. रावसाहेब दानवे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली नाराजी
भाजपच्या या घोषणेमुळे सोमय्या कमालीचे नाराज झाले असून रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिलं आहे. ‘आपण विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला हे अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी,’ असे त्यांनी रावसाहेब दानवेंना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे.
पत्रामधून केली विनंती
‘मी विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतोय आणि करत राहणार आहे. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण आणि प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक देऊ नये,’ असं म्हणत सोमय्यांनी विनंती सुद्धा केली आहे.






