“जिल्हा परिषद भरतीप्रक्रियेत प्रलोभनाला बळी पडू नका’ – ग्रामविकास विभाग

पुणे – राज्यातील 35 जिल्हा परिषदेत रिक्त पदावर सरळ सेवेने भरतीप्रक्रिया सुरू आहे. यात भरती प्रक्रिया राबविनाताना काही व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकास विभागाकडून करण्यात आले आहे.
ग्रामविकास विभागाची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या “आयबीपीएस’ या त्रयस्थ कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत गट – क मधील 30 संवर्गातील एकूण 19 हजार 460 इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याअनुषंगाने 5 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी. कोणतीही व्यक्ती परिक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी. फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, असेही ग्रामविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




