Gram Panchayat Election : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरक्षणाशी संबंधित प्रलंबित मुद्द्यांमुळे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आधीच पुढे ढकलण्यात आल्या असून, आता ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election) निवडणुकाही किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी १४,२३७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी सध्या निवडणुका न घेता प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी ग्रामीण विकास विभागाने अलीकडेच यासंदर्भात महत्त्वाचे आदेश जारी केले असून, १४ ऑगस्ट २०२० च्या शासन आदेशानुसार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी जारी केले असून, ते जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलल्या दरम्यान, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखा बदलल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या शोककाळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. Gram Panchayat Election 2026 पूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. तसेच, मतमोजणीची तारीख ७ फेब्रुवारीऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रतीक्षा वाढणार आरक्षणाचा प्रश्न निकाली न निघाल्यामुळे आणि प्रशासकीय कारणांमुळे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नागरिकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या तरी २०२६ च्या उत्तरार्धापूर्वी ग्रामपंचायत निवडणुका होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.