Instant loan : “काही मिनिटांत कर्ज”, “कमी कागदपत्रांत तात्काळ लोन” अशा आकर्षक जाहिराती दाखवत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बनावट लोन ॲप्सचे जाळे वाढत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांची वैयक्तिक माहिती चोरणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. गुन्हेगार सोशल मीडियावर आकर्षक जाहिराती टाकून नागरिकांना बनावट लोन ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडतात. काही ॲप्स ‘APK’ फाईलद्वारे पाठवली जातात, तर काही प्ले स्टोअरवरही उपलब्ध असल्याचे भासवले जाते. हे ॲप डाउनलोड करताना कॅमेरा, कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो गॅलरी आणि लोकेशनची परवानगी घेतली जाते. त्यानंतर संबंधित नागरिकांची वैयक्तिक माहिती वापरून त्यांना ब्लॅकमेल केले जाते. कर्ज दिल्यानंतर मोठ्या रकमेची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास फोटो मॉर्फ करून नातेवाईक आणि मित्रांना पाठवण्याच्या धमक्या दिल्या जातात. सायबर पोलिसांनी ‘SafalScore-Easy Loan’ आणि ‘FinCure-Credit Assistant’ यांसारख्या संशयित ॲप्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी कोणतेही लोन ॲप डाउनलोड करण्यापूर्वी संबंधित संस्था आरबीआयकडे नोंदणीकृत आहे का, याची खात्री करावी. तसेच अनोळखी ॲप्सना फोटो, कॉन्टॅक्ट्स आणि लोकेशनचा प्रवेश देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. बँक खाते, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती कोणत्याही संशयित ॲपवर अपलोड करू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘अनोळखी लिंक, फेक ॲप्स आणि झटपट कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका. थोडी सावधगिरी मोठी फसवणूक टाळू शकते.’- डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा RR vs LSG : राजस्थानचा लखनऊवर रॉयल विजय; मिचेल मार्शची खेळी व्यर्थ