Nagar: देणगीचा पैसा ग्रामस्थांच्या हितासाठी खर्च व्हावा, अन्यथा आंदोलन

शिर्डी- साईबाबा संस्थानने २८८ कोटींचे शैक्षणिक संकुल बांधले, त्यामध्ये ऑडिटोरियम, मोठमोठे स्क्रीन व इतर गोष्टींचा झगमगाट असला तरी शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षक मिळत नसेल तर या शैक्षणिक संकुलाचा फायदा काय ? साई संस्थानच्या प्रसादलयात मोफत भोजन प्रसाद दिला जातो. तो प्रसाद २५ रुपये केला पाहिजे. मोफत देण्याची काही गरज नाही आणि अन्नदानातून मिळणारा पैसा हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वापरण्यात यावा. तसेच भाविकांच्या देणगीतून येणारा पैसा हा संस्थानने साईभक्त आणि शिर्डी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने खर्च झाला पाहिजे, असे न झाल्यास लवकरच या प्रश्नासाठी आंदोलन करू, असा इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
डॉ.सुजय विखे पाटील यांनी शनिवारी सायंकाळी शिर्डी येथे १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परिक्रमाच्या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित असल्याने या संधीचा फायदा घेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली.
साई संस्थानमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, संस्थानच्या माध्यमातून सध्या जो खर्च सुरू आहे , तो खर्च अशा माध्यमातून हवा की त्या खर्चाची परतफेड या भूमीमध्ये जन्मलेल्या माणसाच्या उपजीविकेचा साधन होणे गरजेचे आहे. संस्थेने हॉस्पिटल बांधायचा निर्णय घेतला, हॉस्पिटल तुम्ही बांधू शकता, परंतु ती आज शिर्डीकरांची गरज नाही. त्यापेक्षा या ठिकाणी एवढे मोठे शैक्षणिक संकुल बांधले, त्या ठिकाणी अकरावी व बारावी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करून या ठिकाणी कोचिंग क्लासेस सुरू करणे गरजेचे आहे. साई संस्थानमध्ये शिकणारा विद्यार्थी हा एंट्रन्स परीक्षेत पास झाला पाहिजे, हा दृष्टिकोन साई संस्थानने ठेवला पाहिजे. साई संस्थांनने दवाखाना उघडला परंतु तिथे फक्त २५ टक्के स्थानिक लोक लाभ घेतात, बाकी ७५ टक्के लोक बाहेरगावचे आहे. ठीक आहे त्यांना आजार बरा होण्याकरिता साहित्य मिळते, आमची अडचण नाही. याने शिर्डी ग्रामस्थांचे जीवनमान बदलते किंवा त्यांना यातून काही फायदा होतो, असे काही नाही.
साईभक्तांना फायदा मिळणे व शिर्डीतील अर्थकारण गतिमान करणे व शिर्डी ग्रामस्थांच्या मुलांचे भविष्य घडवणे हा संस्थांनचा मुख्य हेतू असला पाहिजे. प्रसादालयात मोफत जेवण दिले जाते ते २५ रुपये करणे गरजेचे आहे. अन्नदानातून मिळणाऱ्या पैशातून शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खर्च करा. संपूर्ण देश या ठिकाणी येऊन फुकट जेवण करतो. विविध राज्यातील भिकारी या ठिकाणी येतात, हे काही योग्य नाही. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जी शासनाची जमीन संस्थांनला दिली, त्या ठिकाणी वर्षभरात आयपीएल सुरू कशी होईल, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. एक आयपीएल सामना या ठिकाणी झाला तर शिर्डीचे अर्थव्यवस्था बदलून टाकेल.
जेवढी जबाबदारी साईबाबा संस्थान साईभक्तांची घेतात, तेवढीच जबाबदारी संस्थानने ग्रामस्थांची घेतली पाहिजे. नुसत्या मोठ्या मोठ्या इमारत बांधून काही फायदा नाही. शैक्षणिक संकुलाला दर्जेदार शिक्षक देणे गरजेचे आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्याला उत्कृष्ट इंग्लिश बोलता आले पाहिजे. लवकरच नामदार विखे पाटील यांच्या उपस्थितीत साई संस्थान सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून, शिर्डी ग्रामस्थ व साईबाबांच्या हितासाठी संस्थान प्रशासनाने क्रिकेट स्टेडियम विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे . येणाऱ्या काळात शिर्डीत मोठे बदल दिसेल, लवकरच एमआयडीसी सुरू होणार असून, विविध प्रकल्प देखील लवकरच मार्गी लागणार असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.





