Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत पुन्हा हलगर्जीपणा; हल्ल्याचा कट उधळला, सशस्त्र व्यक्तीला पकडले

Donald Trump – अमेरिकेत या वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. याबाबत राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून निवडणूक लढविणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.
रिव्हरसाइड काउंटी शेरीफ विभागाच्या म्हणण्यानुसार ट्रम्प शनिवारी कॅलिफोर्नियातील कोचेला येथे प्रचार रॅली घेणार होते. रॅलीच्या ठिकाणाजवळून एकाला अटक करण्यात आली. या व्यक्तीवर बेकायदेशीरपणे लोडेड बंदूक आणि उच्च क्षमतेचे काडतूस मॅगझिन बाळगल्याचा आरोप आहे.
वेम मिलर नावाच्या संशयिताला पोलिसांनी रॅलीच्या प्रवेशद्वारापासून अर्धा मैल अंतरावर एका चौकीत थांबवले, असे पोलिसांनी सांगितले.
ट्रम्प यांच्यावर तिसऱ्या हल्ल्याची तयारी होती का, असा प्रश्न यामुळे चर्चिला जातो आहे. शेरीफ चाड बियान्को म्हणाले, ‘आम्ही आणखी एक हत्येचा प्रयत्न रोखला आहे. वेम मिलर ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचत होता.
संशयित, 49 वर्षीय व्यक्ती लास वेगास येथील रहिवासी आहे. अधिकाऱ्यांनी पकडले तेव्हा त्याच्याकडे फक्त बंदुकाच नाहीत तर त्याच्याकडे बनावट प्रेस आयडी आणि व्हीआयपी पासही होते. संशयित काळ्या रंगाची एसयूव्ही चालवत होता जी ट्रम्प रॅलीच्या बाहेर सुरक्षा चौकीवर थांबली होती.
मिलरवर बेकायदेशीरपणे भरलेले बंदुक आणि दारूगोळा बाळगल्याचा आरोप होता. पण नंतर त्याच दिवशी, मिलरला पाच हजार डॉलरच्या जामिनावर सोडण्यात आले. पोलिसांनी सांगितले की मिलर हा उजव्या विचारसरणीच्या सरकारविरोधी संघटनेचा सदस्य असल्याचे समजते.
दरम्यान, शेरीफ कार्यालयाने एक प्रेस नोट जारी केली. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की या घटनेचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम झालेला नाही.
यूएस ऍटर्नी ऑफिस, यूएस सीक्रेट सर्व्हिस आणि एफबीआय यांनी या घटनेबाबत संयुक्त फेडरल स्टेटमेंट जारी केले. या घटनेचा सुरक्षा ऑपरेशनवर कोणताही परिणाम झाला नाही आणि माजी अध्यक्ष ट्रम्प यांना कोणताही धोका नाही. कोणतीही अटक करण्यात आली नसली तरी तपास चालू आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.





