Donald Trump : ब्रिक्स समर्थकांविरोधात 10% अतिरिक्त शुल्क लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन : ब्रिक्स ही काही देशांची संघटना अमेरिकाविरोधी आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. विशेष म्हणजे भारत या संघटनेचा सदस्य आहे. ब्रिक्स देशांच्या पाठीराख्याविरोधात अमेरिका अतिरिक्त दहा टक्के आयात शुल्क लावणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरील व्यापार युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ब्रिक्स या संघटनेत भारताबरोबरच चीन, रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इत्यादी देशांचा समावेश आहे. सध्या या संघटनेच्या सदस्य प्रमुखांची बैठक ब्राझीलमध्ये चालू आहे. ही बैठक चालू असतानाच ट्रम्प यांनी ब्रिक्स संघटनाच अमेरिकेच्या विरोधात आहे असे वक्तव्य केले आहे. दरम्यान भारताविरोधात अमेरिकेने अगोदरच दहा टक्के आयात शुल्क लावले आहे. 9 जुलैपर्यंत व्यापार करार न केल्यास भारता विरोधात 26 टक्के शुल्क लावले जाणार असल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत अमेरिका भारतावर पुन्हा दहा टक्के म्हणजे एकूण 46 टक्के आयात शुल्क अमेरीका लावते की काय या बाबीकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान ब्रिक्स संघटनेत चर्चेवेळी ब्राझीलने ब्रिक्स देेशांनी परस्परादरम्यान व्यापारासाठी एखादी वेगळे चलन निर्माण करण्याच्या शक्यतेवर विचार करावा असे म्हटले आहे. या अगोदरही अशी चर्चा झालेली आहे. मात्र या संदर्भात निर्णय घेतला गेलेला नाही. अशा प्रकारच्या चर्चेला सुद्धा अमेरिकेचा विरोध आहे. जागतिक पातळीवर व्यापारासाठी डॉलर हे अमेरिकेचे चलन सध्या वापरले जात आहे आणि आगामी काळातही वापरले जावे असे डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
भारताकडून भूमिका स्पष्ट
दरम्यान भारत सरकारने व्यापार कराराबाबत आपली भूमिका अद्याप जाहीर केली नसली तरी गेल्या आठवड्यात उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत कोणाच्याही दबावाखाली विशिष्ट काल मर्यादेत करार करण्यासाठी बांधील नाही असे स्पष्ट केले. भारत आपल्या राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देतो. भारताच्या हितसंबंधाचा बळी दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. विविध मुद्यावर अमेरिका आणि भारतादरम्यानची बोलशी थांबलेली असतानाच 9 जुलै ही तारीख काही तासावर येऊन ठेपली आहे.





