Donald Trump : कॅनडावरील शुल्काला तीन दिवसांची स्थगिती; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी कॅनडातील काही वस्तूंवर लागू होणारे ५० टक्के आयात शुल्क तीन दिवसांसाठी स्थगित केले आहे.

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी कॅनडातील काही वस्तूंवर लागू होणारे ५० टक्के आयात शुल्क तीन दिवसांसाठी स्थगित केले आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला.
ट्रम्प (Donald Trump) यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितले की, दोन्ही देशांमध्ये करार झाला असून कागदपत्रांना अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. नवे शुल्क सुमारे २० अब्ज डॉलर किमतीच्या कॅनेडियन वस्तूंवर लागू होणार होते. यामध्ये हॉकी स्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक आणि बांधकाम साहित्याचा समावेश आहे.
अमेरिकी व्यापार प्रतिनिधी कार्यालयानुसार, प्रस्तावित करारात कॅनडामध्ये अमेरिकी वस्तूंना अधिक बाजारपेठीय प्रवेश, आर्थिक सुरक्षेबाबतची आश्वासने आणि डिजिटल व्यापारातील समन्वयाचा समावेश असेल. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी चर्चेत लक्षणीय प्रगती झाल्याचे सांगितले. मात्र, काही महत्त्वाची कामे अद्याप बाकी असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी कॅनडाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत आणि स्पर्धात्मक करण्यावर भर देण्याचेही म्हटले.
वादाचा मुद्दा निकाली?
ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘कीस्टोन एक्सएल’ पाइपलाइनचा मुद्दाही उपस्थित केला. कॅनडातून अमेरिकेत कच्चे तेल वाहून नेणाऱ्या या प्रस्तावित प्रकल्पाला ट्रम्प यांचा पाठिंबा होता. परंतू, माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्याची परवानगी रद्द केली होती.
त्यामुळे हा प्रकल्प दोन्ही देशांमधील वादाचा मुद्दा राहिला आहे. शुल्कावरील तणाव कमी झाल्यास अमेरिका-कॅनडा व्यापार संबंध सुधारण्याबरोबरच ‘यूएसएमसीए’ व्यापार कराराच्या भविष्यातील वाटाघाटींनाही चालना मिळण्याची शक्यता आहे.






