डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफविषयी दिली मोठी माहिती ; आज रात्रीपासून १०-१२ देशांना पाठवणार पत्रे

Donald Trump tariff । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफबाबत मोठी माहिती दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आज रात्रीपासून १० ते १२ देशांना टॅरिफबाबत पत्रे पाठवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे पत्र टॅरिफबाबत या देशांना इशारा देणारे आहे. ज्या देशांसोबत अमेरिकेचा अद्याप व्यापार करार झालेला नाही त्यांना हे पत्र पाठवले जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र ट्रम्प यांनी हे पत्र कोणत्या देशांना पाठवणार आहे हे अजूनही स्पष्ट केलेले नाही.
२ एप्रिल रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी २०० हून अधिक देशांवर टॅरिफची घोषणा केली, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. मात्र काही दिवसांनी ते ९० दिवसांसाठी थांबवण्यात आले, ज्याची अंतिम मुदत ९ जुलै रोजी संपत आहे. या संदर्भात हे पत्र पाठवले जाणार आहे. याविषयी बोलताना ट्रम्प यांनी,”मी एक पत्र पाठवून सांगू इच्छितो की तुम्ही व्यापार करार करू शकता, अन्यथा तुमच्यावर टॅरिफ लादले जातील.” असे म्हणाले आहेत. पुढे ट्रम्प म्हणाले की, या पत्रात कोणाला किती टॅरिफ भरावा लागेल हे देखील नमूद केले असेल.”
दरम्यान त्याच्या एक दिवस अगोदर असे सांगण्यात आले होते कि,भारत आणि अमेरिका यांच्यात ४८ तासांच्या आत टॅरिफबाबत करार (भारत-अमेरिका व्यापार करार) होऊ शकतो. मात्र, दोन्ही देश काही क्षेत्रांवर आपापल्या अटींवर सहमत नाहीत असेही सांगणारे काही वृत्त समोर आले होते. टॅरिफबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे, देश कोणत्याही किंमतीत त्याच्या अटींवर तडजोड करणार नाही.असे भारताने सुरुवातीपासून म्हटले आहे.
भारत आणि अमेरिकेतील करारात काय अडचण ?
अमेरिका भारताकडे कृषी उत्पादनांवरील टॅरिफ कमी करण्याची मागणी करत आहे, जेणेकरून भारतात त्याच्यासाठी एक मोठी बाजारपेठ उघडता येईल. परंतु भारत आपल्या राष्ट्रीय हितासाठी तडजोड करू इच्छित नाही. जर भारताने अमेरिकेतून आयात केलेल्या वस्तूंवरील टॅरिफ कमी केला तर ते भारताच्या कृषी क्षेत्रासाठी मोठा धक्का ठरू शकते. याशिवाय, अमेरिका दुग्धजन्य उत्पादनांवरील टॅरिफ कमी करण्याची मागणी देखील करत आहे.
भारत आपल्या अटींवर तडजोड करणार नाही!
भारताला अमेरिकेचा टॅरिफ १० टक्के किंवा त्याहूनही कमी हवा आहे, जो सध्या अमेरिकेने जाहीर केलेल्या २६ टक्के आहे. याशिवाय, भारताला आपल्या एसएमई उद्योगाला अमेरिकेत बाजारपेठ मिळावी असे वाटते, जेणेकरून देशातील लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळू शकेल.
ट्रम्प यांचा काय आहे दावा ?
ट्रम्प वारंवार भारताबद्दल सांगत आहेत की भारत अमेरिकेसाठी बाजारपेठ खुली करत आहे. ते त्यांचे शुल्क मोठ्या प्रमाणात कमी करणार आहे. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एका निवेदनात “आम्ही अमेरिकेशी व्यवहार करणार आहोत, परंतु आमच्या अटींवर. आम्ही आमच्या देशाशी कोणत्याही किंमतीत तडजोड करणार नाही.”असे म्हटले होते.





