Donald Trump On Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबत मोठा निर्णय, आता 25 टक्के शुल्क आकारले जाणार
Donald Trump On Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे आता युरोपीय देश काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Donald Trump On Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार युद्धात पुन्हा एकदा मोठी ठिणगी टाकली आहे. आपल्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाला अधिक आक्रमक करत, ट्रम्प यांनी युरोपीय युनियनमधून (EU) आयात होणाऱ्या सर्व कार आणि ट्रकवर २५ टक्के आयात शुल्क (Tariff) लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
‘ट्रुथ सोशल’वरून दिला इशारा-
ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घोषणा केली. “युरोपीय युनियनने आधीच्या व्यापार करारांचे योग्य पालन केलेले नाही, त्यामुळे अमेरिकेच्या हितासाठी पुढील आठवड्यापासून हे शुल्क लागू केले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाचा थेट फटका युरोपातील मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे.
कंपन्यांसमोर ठेवला नवा पर्याय-
केवळ दंड आकारणे हा उद्देश नसून, अमेरिकेत गुंतवणूक वाढवणे हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे ट्रम्प यांनी सुचवले आहे. त्यांनी विदेशी कंपन्यांना थेट संदेश दिला आहे की, जर युरोपीय कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांचे उत्पादन अमेरिकेतच केले, तर त्यांना या शुल्कातून सवलत मिळेल. अमेरिकेत आधीच नवीन ऑटोमोबाईल प्लांट्ससाठी १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. यामुळे अमेरिकन नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
US President Donald Trump posts, “I am pleased to announce that, based on the fact the European Union is not complying with our fully agreed to Trade Deal, next week I will be increasing Tariffs charged to the European Union for Cars and Trucks coming into the United States. The… pic.twitter.com/Jl0RFR9fc9
— ANI (@ANI) May 1, 2026
भारताचा संदर्भ –
ट्रम्प यांचे हे कडक धोरण केवळ युरोपपुरते मर्यादित नाही. यापूर्वी त्यांनी भारतावरही २५ टक्के शुल्क लावले होते, जे रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले होते (नंतर त्यात सवलत देण्यात आली).
परिणाम काय होणार?
युरोपीय गाड्या अमेरिकेत महाग झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार. युरोपीय युनियन प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन उत्पादनांवर कर लावण्याची शक्यता. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन इतर देशांच्या व्यापारावरही याचा परिणाम होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे आता युरोपीय देश काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.





