वेस्ट पाम बीच (अमेरिका) : अमेरिकेचे अध्य७ डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून येमेनमधील हौथींचे नियंत्रण असलेल्या भूभागावर शनिवारी हवाई हल्ले करण्यात आले. हौथींकडून सागरी मार्गावरील वाहतूक करणाऱ्या जहाजांवरील हल्ले जोपर्यंत थांबवले जात नाहीत, तोपर्यंत हौथींवर भीषण हवाई हल्ले केले जातील, असा इसाराही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दिला आहे.
अमेरिकेची जहाजे, हवाई वाहतूक करणारी विमाने आणि नौदलाचे रक्षण करण्यासाठी येमेनमधील हौथी दहशतवाद्यांशी संबंधित ठिकाणांवर हवाई हल्ले केले जात आहेत. हौथींचे दहशतवादी तळ, म्होरक्यांशी संबंधित ठिकाणे आणि क्षेपणास्त्रांच्या संरक्षण यंत्रणांवर हे हल्ले केले जात आहेत, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अमेरिकेच्या व्यवसायिक आणि नौदलाच्या जहाजांना जगातल्या कोणत्याही जलमार्गातून प्रवास करण्यापासून कोणतीही दहशतवादी संघटना थांबवू शकत नाही, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
जर हौथींकडून काही आगळीक केली, तर त्यासाठी इराणला जबाबदार धरले जाईल, असे सांगून हौथींना इराणने मदत करू नये, असा इशाराही ट्रम्प यांनी पुन्हा दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी इराणच्या अणू कार्यक्रमावरून वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे पत्र ट्रम्प यांनी इराणला पाठवले होते. हौथींनी मात्र या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. गाजाच्या रक्षणासाठी जहाजांवरील हल्ल्यांची मोहीम सुरूच ठेवली जाईल, असेही म्हटले आहे.
राजधानी सनासह इतर प्रांतातही हल्ले
अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे येमेनची राजधानी सनासह उत्तरेकडील सदा प्रांतामध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. सौदी अरेबियाच्या सीमाभागात हौथी बंडखोरांचे प्राबल्य आहे. या भागातही रविवारी सकाळी अमेरिकेचे हवाई हल्ले झाले. रविवारी पहाटे होदेइदा, बायदा आणि मारिब प्रांतांवर हवाई हल्ले झाले आहेत. सनामध्ये १५ आणि सदा प्रांतात ३ असे १८ जण ठार झाले. तर दोन्ही ठिकाणी मिळून २४ जण जखमी झाले असे हौथींच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.