Donald Trump : भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही; ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा

वॉशिंग्टन : भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. रशियाच्या तेल खरेदीमुळे निर्माण झालेला तणाव भारताने यापुर्वीच मोठ्या प्रमाणात कमी केला आहे आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात जवळपास थांबवले आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. शुक्रवारी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांच्याबरोबरच्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान माध्यमांशी वार्तालापादरम्यान त्यांनी हा दावा केला.
भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याचे प्रमाण कमी केले आहे. रशियाचे तेल खरेदी जेमतेम ३८ टक्के इतकेच केले गेले आहे. आता भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवेल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला दिली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच केला होता. त्यानंतर लगेचच भारताने या संदर्भात एक स्पष्टिकरण देखील दिले होते.
बाजारातील परिस्थितीनुसार निर्माण झालेली गरज पूर्ण करण्यासाठी ऊर्जेचे व्यापक स्त्रोत आणि विविधीकरण प्रस्तावांचा अभ्यास भारत करत आहे. भारतीय जनतेच्या उर्जेच्या गरजेनुसार आणि बाजारातील उपलब्धतेचा अभ्यास करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे भारताने म्हटले होते. रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेनविरुद्धच्या युद्धात भारत रशियाला मदतच करत आहे, असा दावा अमेरिकेकडून वारंवार केला जातो आहे. मुद्द्याच्या अनुषंगाने ट्रम्प यांनी भारतावरील आयात शुल्क ५० टक्क्यांनी वाढवले आहे. यात रशियाच्या तेल खरेदीसाठी २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्काचाही समावेश आहे. अमेरिकेची ही कृती अग्य, असमर्थनीय आणि अवाजवी असल्याचे भारताने म्हटले आहे.





