Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक; तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हवर साधला निशाणा
Donald Trump : ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष ॲलन ग्रीनस्पॅन यांचाही केला उल्लेख

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ आणि भारतीय बँकांतील कमी व्याजदरांचं कौतुक केलं आहे. तर अमेरिकेतील उच्च व्याजदरांवरून अमेरिकी मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’वर जोरदार टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं उदाहरण देत, मजबूत आर्थिक संकेत असूनही व्याजदरांबाबत राजकीय भूमिका घेतल्याचा व कर्जाचा खर्च वाढवल्याचा आरोप केला.
“जगात सर्वात कमी व्याजदर अमेरिकेत असायला हवे. जर अमेरिकेने व्याजदर कमी केले, तर देशाचा जीडीपी कितीतरी पटीने वाढेल. तुम्ही भारताकडे पहा. तिथे व्याजदर कमी आहेत आणि त्यांचा जीडीपी ७ टक्के आहे आणि आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर आपला जीडीपी १४, १५ किंवा कदाचित २० टक्क्यांपर्यंतही पोहोचू शकतो.
आपण इतकी चांगली कामगिरी करतो आणि त्यानंतर हे फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवतात. ही दुर्दैवी गोष्ट आहे.”, असं म्हणत ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हला सुनावलं आहे. आर्थिक आकडेवारी सुधारत असताना, मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवण्याऐवजी कमी करावेत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवले आहे.
फेडरल रिझर्व्हचं ‘राजकीय’ वर्णन
ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचं वर्णन ‘राजकीय’ असं केलं. ट्रम्प यांनी असा आरोप केला की, जेव्हा सकारात्मक आर्थिक आकडेवारी असते, तेव्हा फेडरल रिझर्व्हमधील धोरणकर्ते मुद्दाम व्याजदर वाढवतात, जेणेकरून अर्थव्यवस्थेचा वेग मंदावेल. मध्यवर्ती बँकेच्या भूमिकेच्या विरोधात ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ धोरणांमुळे देशांतर्गत उत्पादन क्षेत्रात मोठी तेजी आली आहे, असाही दावा केला आहे.
यावेळी ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष ॲलन ग्रीनस्पॅन यांचा उल्लेख केला आणि त्यांच्या चलनविषयक धोरणाच्या दृष्टिकोनाबाबत कौतुक केले आहे. ॲलन ग्रीनस्पॅन हे फेडचे एक महान अध्यक्ष होते. जेव्हा आकडेवारी चांगली असायची, तेव्हा ते व्याजदर कमी करायचे.
चांगल्या आकडेवारीमुळे पतपुरवठा सुधारतो, पण आम्ही नेमके याच्या उलट करतो. जर फेडरल रिझर्व्हने त्यांच्या पसंतीचा दृष्टिकोन स्वीकारला, तर अमेरिका लक्षणीयरीत्या अधिक आर्थिक वाढ साध्य करू शकेल, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा:





