Asaduddin Owaisi : डोनाल्ड ट्र्म्प स्वत:ला कोण समजत आहेत? असदुद्दीन ओवेसी यांनी सुनावले

Donald Trump | Asaduddin Owaisi – भारत हे एक एक सार्वभौम राष्ट्र आहे. आम्हाला हुकूम देणारे तुम्ही कोण आहात की, येथून खरेदी करू नका, तेथून खरेदी करू नका. आमची इच्छा असेल त्याकडून आम्ही खरेदी करू, अशा शब्दांत हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांना सुनावले आहे.
अमेरिकेने भारतावर २५ टक्के निर्यात कर लादण्याची घोषणा केली आहे. हा नियम १ ऑगस्टपासून लागू होईल. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घोषणेनंतर भारतातील व्यावसायिक जगात खळबळ उडाली आहे. गुरुवारी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. उद्योगांसोबतच विरोधी नेत्यांनी ट्रम्पच्या कर लादण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ओवेसी म्हणाले की, भारत हा एक गुलाम राज्य नाही की, आम्ही कोणत्या साम्राज्याच्या दरबारात उभे असू. आमच्या ज्येष्ठांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन २०० वर्षांच्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्या. आज ट्रम्प आपल्या अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था म्हणतात. तुम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेकडे पहा. आपण मृत अर्थव्यवस्था कशी असू शकतो? या दिवसासाठी आमच्या वाडवडिलांनी आपले
प्राण दिले होते का?
२५ टक्के आयात कराबाबत ओवैसी म्हणाले, भारत सरकारने उघडपणे सांगितले पाहिजे की, आम्ही हा प्रस्ताव स्वीकारणार नाही. आमच्याकडेही त्यावर कर लावण्याची शक्ती आहे. उद्या अमेरिका म्हणेल की, अमेरिकन उत्पादने भारतातील दुग्ध क्षेत्रातही आणली जातील.
मग अमूलचे काय होईल? पंजाब, हरियाणा, तेलंगणातील शेतकऱ्यांना बाजूला ठेवून इथल्या दुग्ध व्यवसायाचे काय होईल. आता भारतानेही निर्यात होत असलेल्या मालावर तेवढाच कर लावा आणि जशास तसे उत्तर द्या. भारत हा १३३ कोटी लोकांचा देश आहे. अमेरिकेला भारताच्या बाजारपेठेची गरज नसेल तर आभार.
पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे
भारतात जर कोणी भाजपविरुद्ध काही बोलले तर त्याच्याविरुद्ध अनेक विभागांच्या नोटिसा पाठवल्या जातात. आता एका देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत चुकीचे विधान करताना दिसत आहेत. ऑपरेशन सिंदूर थांबवण्यामध्ये अमेरिकेची मध्यस्थी होती, हेही अनेकदा सांगितले जाते. या विषयावर संसदेतही प्रेदीर्घ चर्चा झाली. पण आता पंतप्रधान मोदींनी शांत बसू नये. हे मौन का, याचे उत्तर सत्ताधारी पक्षाने द्यावे, अशी मागणीही ओवेसी यांनी केली.





