Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अचानक इराण युद्धाला पाच दिवसाची स्थगीती जाहीर केली. मात्र ट्रम्प यांच्या घोषणेची माहिती असल्याची शक्यता असणार्यांनी घोषणेअगोदर 20 मिनिटात वायदे बाजारात मोठ्या उलाढाल केल्या. या उलाढाली करणार्यांना वीस मिनिटात 840 कोटी रुपयांचा नफा झाला. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेतील अनेक हेज फंडांच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, हा प्रकार नवीन नाही. सध्याच्या सरकारने यापूर्वी अनेकदा घोषणा करण्यापूर्वी वायदे बाजारात आणि शेअर बाजारात असे व्यवहार झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये सकाळी 6.50 वाजता मोठ्या प्रमाणात वायदे बाजारात खनिज तेलाचे व्यवहार झाले. त्यानंतर केवळ पंधरा मिनिटात म्हणजे सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी ट्रम्प यांनी समाज माध्यमावर आपण युद्धाला पाच दिवसाची स्थगिती देणार असल्याचे जाहीर केले. या कालावधीत खनिज तेलाचे जवळजवळ 580 दशलक्ष डॉलरचे व्यवहार झाले. नियमित व्यवहारापेक्षा हे व्यवहार सहा पटीने जास्त होते. ट्रम्प यांनी घोषणा करण्याअगोदर खनिज तेलाचे वायदे बाजारातील दर वाढले होते आणि घोषणा केल्यानंतर ते लगेच कोसळले. हेही वाचा – युद्धाच्या धामधुमीत पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना फोन, जाणून घ्या काय झालं बोलणं? ट्रम्प यांनी घोषणा करण्याअगोदर आकडेवारी जाहीर होणार नव्हती. तरीही या वीस मिनिटात काही नागरिकांनी 14 हजार कोटी रुपयांचे व्यवहार केले. गेल्या 25 वर्षांमध्ये असा प्रकार एकाच दिवसात झाला नव्हता याचा दाखला काही ब्रोकर देत आहेत. समाज माध्यमावर या घडामोडीबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्या असल्या तरी अमेरिकेतील शेअर बाजार नियंत्रकांनी यावर कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला त्यावेळी असेच प्रकार घडले होते. पत्रकारांनी या बाबीकडे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याकडे प्रतिक्रिया मागितली प्रवक्त्याने सांगितले की, ट्रम्प फक्त अमेरिकेच्या हिताचे निर्णय घेतात. याचा कोणी दुरुपयोग करत असेल तर त्याचा व्हाईट हाऊसशी संबंध नाही. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणच्या माध्यमांनी अमेरिकेबरोबर कसलीही चर्चा चालू नसल्याचे सांगितले आहे हे विशेष.