PM Modi Call Donald Trump: युद्धाच्या धामधुमीत पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना फोन, जाणून घ्या काय झालं बोलणं?
PM Modi Call Donald Trump: या चर्चेत दोन्ही नेत्यांनी मध्य-पूर्वेतील सद्यस्थितीवर सखोल चर्चा केली असून, जागतिक व्यापारासाठी अत्यंत कळीची मानली जाणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) सुरक्षित आणि खुली ठेवण्याच्या महत्त्वावर विशेष भर दिला आहे.

PM Modi Call Donald Trump: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि युद्धाच्या छायेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज फोनवर चर्चा पार पडली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी मध्य-पूर्वेतील सद्यस्थितीवर सखोल चर्चा केली असून, जागतिक व्यापारासाठी अत्यंत कळीची मानली जाणारी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) सुरक्षित आणि खुली ठेवण्याच्या महत्त्वावर विशेष भर दिला आहे.
राजदूत सर्जियो गोर यांनी दिली माहिती –
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत या संवादाची पुष्टी केली. “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. त्यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्याच्या जागतिक महत्त्वावर चर्चा केली,” असे गोर यांनी नमूद केले. युद्धाच्या काळात जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी हा संवाद अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
President Donald Trump just spoke with Prime Minister Modi. They discussed the ongoing situation in the Middle East, including the importance of keeping the Strait of Hormuz open: US Ambassador to India, Sergio Gor pic.twitter.com/uqhTuLuO0x
— ANI (@ANI) March 24, 2026
पंतप्रधानांचे राज्यसभेत महत्त्वपूर्ण विधान –
याच पार्श्वभूमीवर, आज २४ मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत पश्चिम आशियातील युद्धावर भाष्य केले. “पश्चिम आशियातील संघर्षामुळे जगभरातील व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या युद्धामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट भारतासाठी चिंतेची बाब असून, आपली अत्यावश्यक पुरवठा साखळी बाधित होत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. विशेष म्हणजे, होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अनेक जहाजे अडकली असून त्यात भारतीय खलाशीदेखील असल्याचे त्यांनी सांगितले.
शांततेसाठी ‘डायलॉग आणि डिप्लोमेसी’चा मंत्र –
पंतप्रधानांनी सभागृहात स्पष्ट केले की, युद्ध सुरू झाल्यापासून त्यांनी पश्चिम आशियातील बहुतांश राष्ट्राध्यक्षांशी दोन वेळा चर्चा केली आहे. “आम्ही आखाती देशांसह इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या सतत संपर्कात आहोत. संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या (Dialogue and Diplomacy) माध्यमातून या क्षेत्रात शांतता प्रस्थापित करणे हेच भारताचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे मोदींनी ठामपणे मांडले.
दरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. हा मार्ग बंद झाल्यास भारतासह संपूर्ण जगाला इंधन टंचाईचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळेच मोदी-ट्रम्प यांच्यातील ही सहमती जागतिक स्तरावर निर्णायक ठरणार आहे.





