न्यूयॉर्क : विसंगत भाष्य करण्यासाठी ओळखले जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत व पाक दरम्यान झालेल्या संघर्षाचा उल्लेख करताना आठ विमाने पाडण्यात आली असल्याचा दावा केला आहे. परंतू पाडण्यात आलेली विमाने ही कुणाची होती, ते त्यांनी स्पष्ट केले नाही. यापूर्वी त्यांनी ७ विमाने पाडण्यात आली होती, असा दावा केला होता. मात्र त्यामध्ये आता पुन्हा एका विमानाचा नव्याने समावेश केला आहे. फ्लोरिडाच्या मियामीमध्ये झालेल्या अमेरिका बिझनेस फोरममध्ये भाषण करताना ट्रम्प यांनी हा दावा केला. यापूर्वी देखील ट्रम्प यांनी ७ विमाने पाडण्यात आली असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी एक विमान वाढवून पाडलेल्या विमानांचा आकडा ८ वर नेला आहे. भाषण करताना ट्रम्प म्हणाले की, भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत आम्ही व्यापार करारावर चर्चा करत होतो, त्यावेळी ते दोन्ही देश आमनेसामने आल्याचे समजले. या संघर्षात ७ विमाने पाडण्यात आली होती व एक विमान खराब करण्यात आले होते, असे एकूण ८ विमाने पाडण्यात आली आहेत, असे ट्रम्प बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले की, दोन्ही देश हे अण्वस्त्रधारी देश आहेत. अशा दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष कायम राहिल्यास, आम्ही व्यापार करार तोडण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांसोबत शांतता प्रस्थापित केले. हे युद्ध असल्याचे मी आधीच स्पष्ट केले होते. त्यांनी शांततेसाठी सहमती दाखविल्याशिवाय कोणताच करार करणार नाही. मात्र, दोन्ही देशांनी हे युद्ध नसल्याचे सांगितले होते. मात्र तुम्ही युद्ध करणार असाल तर आम्ही तुमच्याशी कोणताही करार करणार नाही, याचा आम्ही पुनरुच्चार केला असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. टॅरिफशिवाय ते कधीच घडले नसते करार करणार नसल्याचा पुनरुच्चार केल्यानंतर, एका दिवसाच्या अंतराने एक फोन आला, ज्यामध्ये आम्ही शांतता केली असल्याचे सांगण्यात आले. त्यावर मी त्यांना धन्यवाद करताना, चला व्यापार करुयात असे सुचवले. तेच उत्तम होते. टॅरिफने या गोष्टी साध्य केल्या. टॅरिफशिवाय ते कधीच घडले नसते, असे देखील ट्रम्प बोलताना म्हणाले. त्यांनी कोसोवो-सर्बिया, काँगो-रवांडा यांसह आठ युद्धे थांबवली असल्याचा देखील दावा यावेळी केला. भारत- पाक संघर्षादरञान सोशल मिडीयावर पोस्ट करताना हा संघर्ष थांबविला होता, याचा 60 पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला आहे.