दिल्लीत दोन परदेशी प्रशिक्षकांसह सहा जणांवर श्वानाचा हल्ला ! “देशाची बदनामी होतीय, याला जबाबदार कोण?” ; भाजप नेत्याचा प्रश्न

Dog Bite in Delhi। दिल्लीतील जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुरक्षेतील मोठ्या त्रुटी उघडकीस आल्या आहेत. जवाहरलाल नेहरू स्टेडियम संकुलात दोन परदेशी प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. चार सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही कुत्र्यांनी चावा असून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, महानगरपालिका सक्रिय झाली आहे, त्यांनी विविध ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना पकडून आणले आहे. दरम्यान, भाजप नेत्याने कुत्र्यांच्या हल्ल्याचा निषेध केला आहे.
भाजप नेते विजय गोयल यांनी, “हा देशाच्या प्रतिष्ठेवर डाग आहे. कुत्र्यांना रस्त्यावर दुर्लक्षित सोडण्याचे आदेश देणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आता याची जबाबदारी घेतील का? देशाची बदनामी होत आहे. जबाबदार कोण?”असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दिल्लीच्या जेएलएन स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान जपान आणि केनियाच्या प्रशिक्षकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला.
पहिल्या घटनेत, केनियाचे प्रशिक्षक डेनिस मरागिया यांच्यावर स्पर्धा मैदानाजवळ एका कुत्र्याने हल्ला केला, ज्यामुळे त्यांच्या पायावर खोल जखम झाली आणि त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच, जपानचे प्रशिक्षक मेइको ओकुमात्सु यांनाही सराव ट्रॅकजवळ प्रशिक्षण सत्रादरम्यान कुत्र्याने चावा घेतला.
दोन्ही प्रशिक्षकांना स्टेडियमच्या मेडिकल रूममध्ये तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले आणि नंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
स्टेडियमभोवती कुत्रे आढळून येत आहेत Dog Bite in Delhi।
या घटनेनंतर, क्रीडा मंत्रालय, दिल्ली सरकार आणि महानगरपालिका सक्रिय झाली आहे. एनडीएमसी आणि एमसीडीच्या पथकांनी स्टेडियम संकुल आणि आसपासच्या परिसरात भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या घटनांनंतर, प्रशासनाने भटक्या कुत्र्यांना सुरक्षितपणे काढून टाकण्यासाठी स्टेडियम संकुलात चार कायमस्वरूपी कुत्रे पकडणारे पथके, जलद प्रतिसाद युनिट्स आणि वाहने तैनात केली आहेत.
आयोजन समितीचे सदस्य अर्णब घोष म्हणाले की, केनियन खेळाडूशी संबंधित कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनेनंतर, काल रात्रीपासून एक विशेष पथक सक्रिय झाले आहे आणि त्यांनी स्टेडियममधून सर्व कुत्रे काढून टाकले आहेत. भारत पहिल्यांदाच जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करत आहे आणि या घटनांमुळे या स्पर्धेच्या तयारी आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कुत्र्यांच्या हल्ल्याबद्दल परदेशी प्रशिक्षकांनी काय म्हटले?
केनियाच्या संघाचे प्रतिनिधी जोएल अतुती यांनी सांगितले की, खेळाडू डेनिस मरागिया यांना कॉल रूमजवळ एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. कॉल रूममध्ये खेळाडू त्यांच्या कार्यक्रमांपूर्वी एकत्र जमतात. या घटनेनंतर, स्टेडियमच्या वैद्यकीय पथकाने तातडीने प्राथमिक उपचार केले आणि आवश्यक उपचार सुरू करून त्याला रुग्णालयात नेले.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय आहे? Dog Bite in Delhi।
११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना तात्पुरते आश्रयस्थानांमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले. तथापि, २२ ऑगस्ट रोजी सुधारित आदेशात असे म्हटले होते की नसबंदी आणि लसीकरणानंतर कुत्र्यांना त्यांच्या मूळ अधिवासात परत सोडले जाईल. हा नियम रेबीजने संक्रमित किंवा आक्रमक स्वभावाच्या कुत्र्यांना लागू होणार नाही.





