चिंबळीत भटक्या कुत्र्यांनी 4 वर्षीय बालकाचे लचके तोडले; ससून रुग्णालयात उपचार सुरु

चिंबळी – भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाला आहे. खेड तालुक्यातील चिंबळी येथील बर्गेवस्ती येथे शनिवारी (दि. 20) सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. असुमित कुशवा (वय 4 वर्ष) असे जखमी बालकाचे नाव आहे.
कुत्र्यांनी बालकाच्या डोक्याचे व गुप्तांगाचे लचके तोडले आहेत. हल्ल्यानंतर असुमितला उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अंगणात खेळत असताना अचानक चार ते पाच कुत्र्यांच्या टोळक्याने बालकावर हल्ला केला.
चिंबळी परिसर खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात आहे. येथील वाडीवस्तीवर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. ग्रामस्थ व नागरिक हैराण झाले असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कचरा डेपोतील भटक्या कुत्र्यांना पकडून आणून येथे सोडले जात असल्याच्या तक्रारी नागरिक वारंवार करत होते. त्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. याच कुत्र्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात चार वर्षीय असुमित गंभीर जखमी झाला आहे.
चिंबळी, केळगाव, कुरूळी फाटा परिसरात सध्या भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जावा अशी मागणी नागरिक करत आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त पसरताच परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.





