State Women Commission :“फक्त मुंबई-पुण्यातच महिलांवर अत्याचार होतात का? महिला आयोगाच्या बैठकीतून डावलल्याने नीलम गोऱ्हेंवर संताप

मुंबई : महिला आयोगाच्या भविष्यातील धोरणांवर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीवर आता वादंग निर्माण झाले आहे. या बैठकीस विदर्भ व मराठवाड्यातील माजी महिला आयोग सदस्य व कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज (३ जून) मुंबईत महिला आयोगाच्या माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. मात्र अकोल्याच्या डॉ. आशा मिरगे, नागपूरच्या आभा पांडे, निता ठाकरे आणि चंद्रपूरच्या डॉ. विजया बांगडे यांना या बैठकीस निमंत्रण न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या महिलांनी अलिकडच्या १५ वर्षांत आयोगावर कार्यरत राहून महिला हक्कांसाठी काम केलं आहे.
“महिला धोरणं फक्त मुंबई-पुण्यात ठरतात का?” : आशा मिरगेंचा सवाल
या बैठकीत विदर्भ व मराठवाड्याच्या एकाही महिला कार्यकर्त्याला न बोलावणं हे अन्यायकारक असल्याचं मत मिरगेंनी व्यक्त केलं आहे. “महिलांवरील सर्व अत्याचार फक्त मुंबई-पुण्यातच होतात का? विदर्भात काय स्त्रियांची समस्या नाहीत का? आम्ही महाराष्ट्रात राहत नाही का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
“नीलम गोऱ्हे यांच्यावर वैयक्तिक टीका करायची नाही, त्या घटनात्मक पदावर आहेत. पण त्यांचं हे वर्तन ‘आम्हीच कायदा ठरवणार’ अशा अहंकाराचं आहे,” असा आरोपही मिरगेंनी केला.
रुपाली चाकणकरांवरही टीका
मिरगे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही जोरदार टीका केली. “त्यांना आयोगाच्या कामाचा पुरेसा अनुभव नाही, तरीही त्यांच्यावर जबाबदारी टाकली गेली. त्यांनी एका कार्यक्रमात PCPNDT कायद्याचा चुकीचा उच्चार करून आपलं अज्ञान दाखवलं,” असे सांगत त्यांनी रुपाली चाकणकरांच्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
“महिला धोरणांवर बोलताना विदर्भ-मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग नसेल, तर हा एकतर्फी आणि राजकीय हेतूने प्रेरित कार्यक्रम मानावा लागेल,” असं मिरगेंनी ठामपणे स्पष्ट केलं.





