Nagar | कोणी रस्ता करता का रस्ता ?

निघोज, (वार्ताहर) – निघोजमधील ट्रॅक्टर गॅरेजच्या मागील बाजूचा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जवळचा व सुरक्षित असणारा लाळगे मळा चारी रस्त्यावर सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
हा रस्ता श्री मुलिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जाण्या-येण्याकरिता अत्यंत जवळ, कमी वर्दळीचा असून शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित रस्ता असल्याने येथून अनेक विद्यार्थी या रस्त्याचा वापर करतात.
हा रस्ता पाटबंधारे विभागाच्या पाटपाणी चारी अंतर्गत असल्याने यावर कोणताही शासकीय निधी मंजूर होत नव्हता. पण दुरुस्ती, मजबूती व पक्का रस्ता करून वापरण्यास पाटबंधारे विभागाने अलीकडच्या काळात परवानगी दिल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शिरूर रस्त्यापासून ट्रॅक्टर गॅरेजच्या मागील बाजूस चारी रस्ता, शासकीय इंदिरा वसाहत, प्रशांत अपार्टमेंट, लाळगे मळा वस्ती, श्री वरदविनायक गणपती मंदिर ते श्री मुलिका देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया पर्यंतचा सव्वा किलो मीटरपर्यंतचा हा काळ्या मातीचा कच्चा रस्ता असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शाळेसाठी हा अत्यंत जवळचा, सुरक्षित रस्ता असल्याने शाळेचे विद्यार्थी पायी किंवा सायकलने ये- जा करतात.
चिखलामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या सायकलला चिखल अडकून घसरून पडत आहे.अनेक दुचाकी गाड्या चिखलामुळे जाम होऊन दुचाकीस्वार घसरून पडले. त्यांना दुखापतही झाली. या रस्त्याने सध्या पायी चालणेही मुश्किल झाले आहे . परिणामी विद्यार्थ्यांना लांबून वळसा घालून निघोज बसस्थानक परिसरातून वर्दळ व रहदारीच्या मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते.
शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस या मुख्य रस्त्यावर प्रचंड वाहतूक असते. कधी कधी वाहतूक कोंडी ही होती व विद्यार्थांचे अपघात झाल्याचे घटना घडल्या आहेत. या रस्त्याच्या कडेला अनेक शेतकऱ्यांची शेती असल्याने त्यांना शेती कामासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. परिणामी सध्या या रस्त्याने प्रवासी करणे जोखमीचे झाले आहे.





