Doctors Strike | फक्त एक वर्षाचा कोर्स आणि डॉक्टर? ; IMA चा तीव्र विरोध, आजपासून २४ तासांसाठी वैद्यकीय सेवा बंद..जाणून घ्या कारण

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सर्टिर्फिकेट कोर्स इन माॅर्डन फार्माकाॅलाॅजी (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डाॅक्टरांनी ॲलोपॅथी औषधांचा वापर करण्यास परवानगी देण्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए)पुणे शाखेने आक्रमक पवित्रा घेत २४ तासांसाठी वैद्यकीय सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने नुकत्याच काढलेल्या अधिसुचनेनुसार होमिओपॅथी डाॅक्टरांना वरील परवानगी मिळणार असून त्याला आयएमएचा तीव्र विरोध आहे.निर्णयाचा निषेध म्हणून आयएमए पुणे १८ सप्टेंबर पासून २४ तासांसाठी संपूर्ण वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे आयएमए अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे यांच्यासह सचिव डॉ. रंजीत घाटगे, डॉ. अंजली साबणे आणि प्रवक्ते डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.
या आंदोलनाला सर्व रुग्णालये, वैद्यकीय सहकारी संघटना तसेच सेंट्रल मार्ड यांचा पाठींबा आहे. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत निषेध आंदोलन होणार आहे. त्यामध्ये राज्यातील जवळपास दोन लाख अॅलोपॅथी डॉक्टर (त्यापैकी १०,००० फक्त पुणे शहरातून) या आंदोलनात भाग घेत आहेत.राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाने घेतलेल्या निर्णय हा आरोग्य सेवा व्यवस्थेची सुरक्षितता आणि गुणवत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणारा आहे.
एमबीबीएस अभ्यासक्रम साडेपाच वर्षाचा असून, त्यामध्ये १९ विषयांचा परिपूर्ण अभ्यास, अत्यंत सखोल क्लिनिकल अनुभव व एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप असते. सीसीएमपी हा केवळ एक वर्षाचा कोर्स असून, आठवड्यातून दोन दिवस शिकवला जातो. त्यातून आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील आवश्यक ज्ञान, कौशल्ये व निर्णयक्षमता विकसित होणे शक्य नाही, असे आयएमएतर्फे स्पष्ट करण्यात आले.या बदलाने रूग्णांना उपचार देताना सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू शकतो.
आंतरराष्ट्रीय दर्जा घसरण्याचा धोका, भविष्यातील धोके यासह विविध प्रश्न आयएमएने मांडत सीसीएमपी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौउन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा निर्णय तात्काळ स्थगित करावा. प्रलंबित उच्च न्यायालय खटल्याचा निकाल येईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केवळ पूर्णपणे प्रशिक्षित व पात्र एमबीबीएस डॉक्टरांनाच आधुनिक वैद्यकीय परवाना द्यावा, असेही आयएमएने म्हटले आहे.





