नागपूर – कोलकात्याच्या आरजी कर हॉस्पिटल आणि मेडिकलकॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी महिला डाॅक्टरवर सामुहिक अत्याचार करून तिचा खून केला. या प्रकरणावरून डाॅक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील प्रशिक्षणार्थी निवासी डाॅक्टरांनी संप सुरू केला आहे. नागपुरातील मेयो, मेडिकलमधील डाॅक्टर संपावर असतानाच आता एम्स नागपूरच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ आंतरवासीता निवासी डॉक्टरांनी संघटना स्थापन करीत संपात सहभागी झाले आहेत. यामुळे नागपुरात रूग्णसेवेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. संपकाळात आपत्कालीन सेवा आणि आयसीयू नेहमीप्रमाणे कार्यरत राहिल असे एम्सच्या संघटनेने कळवले आहे. शुक्रवारपासून राज्यातील राज्यातील वरिष्ठ निवासी, शिकाऊ डाॅक्टर्सही संपावर गेले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर, मार्डने घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा असल्याचे संघटनेने कळवले आहे. समस्या, मागण्यांचे निराकरण न झाल्यास, सर्व बंधपत्रित, ज्येष्ठ रहिवासी १६ ऑगस्टपासून वैकल्पिक सेवांमध्ये काम करणे थांबवतील असे पत्र दिले आहे. काय आहेत मागण्या? केंद्रीय प्राधिकरणाकडून या गुन्ह्याचा निःपक्षपाती, पारदर्शक तपास करावा, आंदोलक सहकाऱ्यांवर पोलिसांकडून अत्याचार केला जाणार नाही याची हमी, केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, सुरक्षा उपायांत सुधारणा करीत सुरक्षा परिषदेची स्थापना करून, नवीन सुरक्षा ऑडिट, सुप्रशिक्षित आणि सुसज्ज सुरक्षा कर्मचाऱ्यांची भरती, संपूर्ण कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, ऑन-कॉल रूम आणि दर्जेदार वसतिगृहांची तरतूद करावी, पुरुष, महिला निवासी डॉक्टरांसाठी समर्पित ऑन-कॉल रूमचे वाटप, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या प्रलंबित समस्यांचे निराकरण, जवळच्या हॉस्पिटल/कॉलेजमध्ये दारू/पदार्थ विक्रीवर बंदी घालणे, राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप मर्यादित करणे, कॅम्पसच्या आत पोलिस चौकी नियमित पोलिस गस्त घालावी आदी मागण्या केल्या आहे.