सोलापूर : अहिल्यानगर जिल्ह्यात एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संग्राम जगताप यांनी करमाळा येथे ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’तून वादग्रस्त विधान केले. दिवाळी खरेदी फक्त हिंदू दुकानांमधून करावी, तसेच हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले मशीदेतून घडत असल्याचा दावा त्यांनी केला. या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद भडकण्याची शक्यता आहे. ‘आधी एक छोटासा चिंटू होता, आता चिकणी चमेली आली’ गुरुवारी अहिल्यानगरमध्ये झालेल्या ओवैसींच्या सभेत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संग्राम जगतापांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. ‘आधी एक छोटासा चिंटू होता, आता चिकणी चमेली आली आहे,’ असा टोला त्यांनी लगावला. या टीकेला प्रत्युत्तर देताना जगताप यांनी आज करमाळा येथील मोर्चात बोलताना म्हटले, येणाऱ्या दिवाळीसाठी प्रत्येक नागरिकाने खरेदी फक्त हिंदू लोकांच्या दुकानांमधून करावी. आपल्या दिवाळी खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा, असं संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. हिंदूंवर होणारे हल्ले हे मशीदेतून याशिवाय, त्यांनी आणखी एक संवेदनशील विधान केले, “सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशीदेतून घडत आहेत.” हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत असून, विविध राजकीय पक्षांकडून त्यावर टीका होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अजित पवार गट स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर तसेच यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीचा वारसा जोडणारा पक्ष म्हणवतो. मात्र, त्यांच्याच आमदाराने ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अशी आवाहने केल्याने पक्षांतर्गत आणि बाहेरील भुवया उंचावल्या आहेत. करमाळा येथे आज काढण्यात आलेल्या ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’त संग्राम जगताप यांच्यासह जायंट किलर आमदार अमोल खताळ उपस्थित होते. मोर्चादरम्यान ठिकठिकाणी जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. इम्तियाज जलील यांच्या जहरी टीकेला उत्तर देताना जगताप यांनी म्हटले, “या टीकेला मी उत्तर देणार नाही, पण अहिल्यानगर येथे येत्या जाहीर सभेत उत्तर देईन.” या मोर्चाचा मुख्य उद्देश हिंदू समाजाच्या असंतोषाला हवा देणे असल्याचे सांगितले जात आहे.