तुम्हाला माहिती आहे का ? पृथ्वीच्या ‘या’ ठिकाणी आहे प्रवेशबंदी

पृथ्वीच्या पाठीवर अनेक गूढ अशी ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी अतिशय प्रतिकूल आणि विचित्र परिस्थिती असते. असे असले तरी माणसाला मात्र तेथील परिस्थिती विषयी कायम कुतूहल वाटत राहिलेले असते आणि त्यामुळेच त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला असतो. पृथ्वीवरील अशा अनेक गूढ ठिकाणी जाण्यास आता प्रतिबंध करण्यात आलेला आहे. विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण असे एक ठिकाण भारतातही आहे.
१) स्नेक आयलँड (ब्राझील) – ब्राझील मधील हे छोटेसे बेट सापांचा अधिवास म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अतिशय विषारी सापांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. अगदी सोनेरी रंगाचे डोके असणारे वायपर या जातीचे विषारी साप या ठिकाणी आढळतात. त्यामुळे या बेटावर कुणालाही जाण्यास ब्राझील सरकारने बंदी घातली आहे. त्यामागे माणसाच्या जीवाची सुरक्षितता याचबरोबर दुर्मिळ प्राण्यांचे रक्षण करणे असा दुहेरी हेतू आहे.
२) चेर्नोबिल अणुभट्टी परिसर 1986 मध्ये चेर्नोबिल येथील अणुभट्टीत दुर्घटना होऊन किरणोत्सर्जन झाले होते. त्यामुळे त्याठिकाणी काम करणाऱ्यांपेकी ४० जणांना प्राण गमवावे लागले तर अनेक जण जायबंदी झाले. या दुर्घटनेतील काहीजणांचा नंतरही मृत्यू झाला. त्यामुळे आता या ठिकाणी कुणालाही जाऊ दिले जात नाही. आजही येथील हवा आणि पाणी अतिशय दूषित आणि विषारी स्वरूपाचे आहे. अर्थात अभ्यासक आणि संशोधकांना पूर्ण काळजी घेऊनच आणि सुरक्षिततेची साधने वापरूनच या ठिकाणी जाण्यास परवानगी दिली जाते.
३) स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट – नॉर्वेतील आर्टिक समुद्र परिसरात हे ठिकाण आहे. पृथ्वीवर कोणतीही दुर्घटना झाली आणि बी बियाणे आणि निसर्गातील झाडे वनसंपदा नष्ट झाली तर पुन्हा त्यांची निर्मिती करता यावी यासाठी या ठिकाणी बियाणे जपून ठेवण्यात आलेले आहे. जेणेकरून पृथ्वीच्या पाठीवरील जैवविविधतेचे संरक्षण व्हावे. या ठिकाणी कुणालाही जाता येत नाही. मुख्य म्हणजे हे ठिकाण अतिशय दुर्गम भागात आहे आणि त्या ठिकाणी अतिशय प्रतिकूल हवामान असते. त्यामुळे कुठल्याही धोक्यापासून बियाणे या ठिकाणी सुरक्षित आहे असे मानले जाते.
४) नंबर फोर एरिया फिफ्टी वन (अमेरिका) अमेरिकी हवाई दलाचा हा अतिशय गुप्त असा तळ आहे. या ठिकाणाबाबत अनेक कटकारस्थानांच्या अफवा आणि गोष्टी चर्चिल्या जात असतात. हे ठिकाण नेवाडातील वाळवंटात आहे आणि त्या ठिकाणी जाण्यास सर्वसामान्य नागरिकांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे घातक संशोधनही केले जाते असेही सांगितले जाते.
५) माउंट वेदर इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (अमेरिका) हे ठिकाण वर्जीनिया मधील ब्ल्यू रिच पर्वतराजीतील खोलवर ठिकाणी आहे. अमेरिकेतील सरकारचा कारभार चालवण्यासाठी आणीबाणीच्या प्रसंगात बॅकअप लोकेशन म्हणून याचा वापर करण्याचे नियोजन आहे. अमेरिकी सरकार वर जर का आणीबाणीची परिस्थिती ओढवली तर वॉशिंग्टन खेरीज अन्य सुरक्षित ठिकाणाहून सरकारचा कारभार चालवता यावा यासाठी या ठिकाणी सर्व अत्याधुनिक यंत्रणा तसेच बंकर्स उभारण्यात आलेले आहेत. ही सर्व यंत्रणा जमिनीखाली कार्यरत असते. त्यामुळे अर्थातच या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नाही.
६) व्हॅटिकन सिक्रेट अर्काईव्हज् (व्हॅटिकन सिटी) – या ठिकाणी गुप्त अशी ऐतिहासिक कागदपत्रे आणि पोप यांचा पत्रव्यवहार तसेच हस्तलिखिते ठेवण्यात आलेली आहेत. हजारो शतकांचा हा ठेवा अतिशय महत्त्वाचा असल्याने या ठिकाणी जाण्यास सर्वसामान्य नागरिकांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या संदर्भात संशोधन करणारे खरेखुरे संशोधक यांनाच अपवाद म्हणून परवानगी दिली जाते. या सर्व गुप्ततेमागे अनेक अफवा देखील सांगितल्या जातात, तसेच काही दंतकथा देखील सांगितल्या जातात.
७) उत्तर सेंटीनेल बेट (भारत) हे ठिकाण बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या जवळ आहे. उत्तर सेंटिनल बेटांवर मूळ आदिवासी जमातीचे लोक आजही राहतात आणि बाहेरच्या लोकांना येण्यास ते अतिशय निकराने विरोध करतात. या ठिकाणी बाहेरून कोणी जाण्यास चा प्रयत्न केल्यास मूळ आदिवासी लोक त्याला ठार मारण्यास मागेपुढे पाहत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे तेथील स्थानिक आदिवासी लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असण्याची शक्यता असून त्यामुळे अन्य भागातील नागरिक तिथे गेल्यास त्यांना संसर्ग होऊन मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे देखील बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. हा भारत सरकारने संरक्षित भाग म्हणून जाहीर केलेला आहे.
८) क्वीन शी हूआंग ची कबर – चीनमधील दोन हजार वर्षांपूर्वीच्या या संग्रहालयात चिनी सम्राट क्वीन शी हूआंग याच्याशी संबंधित योद्ध्यांचे अनेक पुतळे आहेत. याची रचना पिरॅमिडप्रमाणेच आहे. ही कबर म्हणजे चीनमधील एक मोठा संस्मरणीय साठा असल्याचे सांगितले जाते. या कबरीच्या खाली खूप मोठा जागा असून त्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या ठिकाणी कुठले खोदकाम तसेच संशोधन करण्यास चीन सरकारने बंदी घातलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणालाही जाता येत नाही.





