“गणपतीचं वाहन आहे म्हणून घरात उंदीर ठेवतो का?”; कबुतरखाना प्रकरणावर राज ठाकरेंचे भाष्य

Raj Thackeray | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. बेस्ट पतपेढी निवडणूकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. यावेळी दोघांमध्ये साधारण 50 मिनिटं चर्चा झाली.
या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ही राजकीय भेट नव्हती, तर शहर विकास, वाहनतळं आणि रस्त्यावरील पार्किंग याविषयावर चर्चा झाल्याची माहिती दिली. यावेळी राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कबुतरखानाच्या मुद्यावर देखील भाष्य केले.
“कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरुन राजकीय वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आम्हाला कुठे प्रतिसाद द्यायचा, हे कळते. काही जणांना कबुतरांचा मुद्दा वाद होईल, अशा पद्धतीनेच लावून धरायचा होता. पण त्यांना लक्षात आले की, आमच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.
माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का?
यावेळी राज ठाकरे यांनी रस्त्यांवर कबुतरांना खाणे घालण्याचा आग्रह धरणाऱ्या जैन समाजाला चांगलेच सुनावले आहे. “मला एक गोष्ट कळत नाही. तुमच्या घरात चार उंदीर झाले तर आपण काय करतो, गणपतीचं वाहन आहे म्हणून आपण घरात उंदीर ठेवतो का? मग असे कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात, माणसं मेलेली चालतात, कबुतरं मेली नाही पाहिजेत. आज रेल्वेखाली, खड्यात माणसं जातात, माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
बेस्ट पतपेढी निवडणूकांच्या निकालाबाबत काय म्हणाले राज ठाकरे ?
तर बेस्ट पतपेढी निवडणूकांच्या निकालाबाबत राज ठाकरे यांनी एका वाक्यात उत्तर देत ही निवडणूक फारशी महत्त्वाची नव्हती. अशा निवडणुका स्थानिक पातळीवर होत असतात. त्याबाबत मला माहिती नसल्याचे उत्तर दिले.
दरम्यान, कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होत असल्याने मुंबई महानगरपालिकेने हायकोर्टाच्या आदेशानुसार कबुतरखाने बंद केले. मात्र, दादरमधील कबुतरखाना बंद करण्यास स्थानिक जैन समाजाने विरोध केला होता. यानंतर उच्च न्यायालयाने कबुतरांना रस्त्यावर खाणे घालण्यावरील बंदी कायम ठेवली. मात्र या आदेशानंतर देखील काहींंनी उरमटपणा केल्याचे पाहायला मिळाले होते. Raj Thackeray |
हेही वाचा:
Shirur Crime News : शिरुरमध्ये पैशांच्या वादातून तरुणावर दगडफेक; सोन्याची चैन केली लंपास





