क्रिकेट काॅर्नर : पंचांनी केवळ चेंडूच मोजायचे का?

आयपीएल स्पर्धेत अनेक सामन्यांत वाईड चेंडूंबाबत तसेच वेस्ट हाईट फुलटॉसवर नोबॉल द्यायचा की नाही, यावरून वाद घडल्याचे दिसून आले. आता तर काय अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी वाईड चेंडू व वेस्ट हाईट फुलटॉस चेंडूंबाबतही डीआरएस घ्यावा असे मत व्यक्त केले आहे. जे मैदानावरील पंच निश्चितच ठरवू शकतात त्यासाठी डीआरएस कशासाठी? जर सगळेच निर्णय तंत्रज्ञानावर सोपवले गेले तर मैदानावरील पंचांनी काय केवळ षटकातील चेंडूच मोजायचे का?
तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर त्याचा वापर का करू नये, असा एक विचारही पुढे येत आहे. मात्र, प्रत्येक तंत्रज्ञान निर्दोष नसते. जे पूर्वी डीआरएसबाबतही बोलले जात होते, तेच वाईड चेंडू व कमरेच्या वर टाकला जाणारा फुलटॉस चेंडूंवरही बोलले जात आहे. न्यूझीलंडचा माजी कसोटीपटू व राजस्थानचा प्रशिक्षण सल्लागार डॅनियल व्हिटोरी व इम्रान ताहीर यांनी ही मागणी केली आहे, की या दोन गोष्टींसाठीही डीआरएस घेतला जावा. मागे एकदा डीआरएसवरून चांगलाच वाद रंगला होता.
मैदानावरील पंचांचे अधिकार कमी होतील व त्यांचे महत्त्व कमी होईल असे बोलले गेले. त्यावेळी हे चित्र इतके गंभीर वाटले नव्हते. मात्र, आता या दोन चेंडूंबाबतही जर डीआरएस घेतला गेला तर मात्र, मैदानावरील पंचांचे काम केवळ षटकातील चेंडू मोजायचेच राहील व पंच हवेतच कशाला इतकी टोकाची भूमिकाही समोर येईल. वाईड व वेस्ट हाईट फुलटॉस चेंडूंबाबत डीआरएस घेतले जाऊ लागले तर मग नोबॉल, लेग बाय, बाय या व अशा प्रत्येक नियमासाठीच डीआरएसची मागणी होईल मग पंचांचे महत्त्व व अस्तित्वच पुसले जाईल. सामन्याचा वेळही वाढवावा लागेल व त्यामुळे कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 सामने रटाळ होतील व त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम या खेळावरच झालेला दिसेल.
क्रिकेटच्या नियमावलीत वाईड चेंडूबातचा नियम असे सांगतो की, गोलंदाजाने टाकलेला चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जात असेल किंवा आखलेल्या मर्यादा रेषेच्याही बाहेरून जात असेल तर तो चेंडू वाईड ठरवला जातो. मात्र, त्यावेळी या चेंडूवरही फटका मारण्याचा प्रयत्न करताना फलंदाजही ऑफला शफल झाला असेल तर पंच हा चेंडू वैध ठरवतात; परंतु जरी फलंदाज असा शफल होत असताना चेंडू मूळ खेळपट्टी सोडूनच बाहेर जात असेल तर त्याला वाईडच ठरवले जाते. यंदाच्या
स्पर्धेत काही लढतींमध्ये पंचांनी असे चेंडू वाईड घोषित केले नव्हते व त्यामुळेच हा वाद सुरू आहे. पंच हा देखील एक माणूसच असून चुका त्याच्याकडूनही होऊ शकतात. मात्र, त्यावर लगेचच याबातचा निर्णय डीआरएसने दिला जावा असे म्हणणे योग्य नाही. कारण मग रोगापेक्षा इलाज भयंकर असेच चित्र दिसेल.





