घटस्थापना करा दुपारी पावणेदोन वाजेपर्यंतच ; घरोघरी, मंदिरांमध्ये जय्यत तयारी

पुणे – शारदीय नवरात्रौत्सवास रविवारी ( 15 ऑक्टो.) घटस्थापनेने सुरुवात होत आहे. घरोघरी आणि मंदिरांमध्ये घटस्थापना केली जाते. त्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. शहरातही मांगल्याचे वातावरण आहे.
ब्राह्म मुहूर्तावर म्हणजेच पहाटे पाचपासून ते दुपारी पावणेदोनपर्यंत सोईनुसार घटस्थापना करता येणार आहे. गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते शारदीय नवरात्रौत्सव अर्थात घटस्थापना, दसऱ्याचे. रविवारी घटस्थापना होणार असून, विजयादशमीपर्यंत म्हणजे 24 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रौत्सव साजरा होणार आहे.

यंदा चित्रा नक्षत्र, वैधृती योग असला, तरी हे कर्म तिथीप्रधान असल्याने ब्राह्म मुहूर्तापासून ते दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत घटस्थापना करता येणार असल्याची माहिती “दाते पंचागकर्ते’चे मोहन दाते यांनी दिली.
सर्वसाधारणपणे नवरात्रौत्थापन आणि दसरा एका दिवशी येतात. मात्र, या वेळेस दसऱ्याच्या आदल्या दिवशी ते आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नऊ किंवा 10 दिवसांचा कालावधी असतो. तिथीच्या क्षय किंवा वृद्धीमुळे असा फरक असतो. पण, या वर्षी घटस्थापनेपासून नवव्या दिवशी नवरात्रौत्थापन असून, दसरा दहाव्या दिवशी आहे.
– मोहन दाते,”दाते पंचागकर्ते’





