कोंढरी गावचे माळीन होऊ देऊ नका

तातडीने पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांची मागणी

भुजंगराव दाभाडे

भोर- तालुक्‍यातील हिर्डोशी खोऱ्यातील अतिदुर्गम डोंगरी भागातील कोंढरी गावच्या डोंगर रानाला मुसळधार पावसामुळे मोठ्या भेगा पडून भूस्खलन झाले होते. अतिवृष्टीमुळे शेती आणि वनसंपदेचे लाखों रुपयांचे नुकसान झाले होते. सरकारने तातडीने या गावचे पुनर्वसन करण्याचे जाहीर केले होते. मात्र, दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरीही शासनस्तरावर अद्याप कोणतीही कृती होत नसल्याने कोंढरी गावचे माळीण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्‍त केली आहे.

भोर तालुक्‍यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कोंढरी गावच्या डोंगर रानाला भेगा पडून भूस्खलन झाल्याने शेतकऱ्यांची उभी भाताची पिके आणि बांबूची शंभरपेक्षा अधिक बेटे जमिनदोस्त झाली होती. याची माहिती भोरच्या प्रशासनाला मिळताच भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर हिर्डोशीच्या प्राथमिक शाळेत केले होते. त्यानंतर आमदार संग्राम थोपटे यांनी राज्याचे पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समवेत कोंढरी गावाला भेट दिली होती. तसेच पशुधनासाठी पत्र्याचे शेड आणि गावचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन दिले होते.
या महिन्याच्या सुरुवातीस पावसाचा जोर ओसरल्याने उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी भू वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार ग्रामस्थांना त्यांचे घरी परतण्याची विनंती केली होती. त्यानुसार ते परतलेही. मात्र, आता पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने कोंढरी गावचे 35-40 कुटुंबातील लोक भितीच्या सावटाखाली जगत आहेत.

आमदार संग्राम थोपटे यांनी बाळा भेगडे यांना पुनर्वसनसाठी रस्त्याच्या कडेच्या जागाही दाखवल्या होत्या. त्यानंतर जमीन अधिग्रहनाच्या सूचना बाळा भेगडे यांनी दिल्या होत्या. तसेच गावचे तातडीने पुनर्वसन व पशुधनासाठी एकत्रित शेड उभारण्याचे आश्वासन दिले असतानाही अद्याप ते पूर्ण झाले नाही. त्यामळे कोंढरी ग्रामस्थांना कोणी घर देता का घर असे म्हणण्याची वेळ आली आहे.

 • नागरिकांच्या मनात अजूनही भीती
  कोंढरी हे डोंगर रानात बसलेले 35 ते 40 कुटुंबांचे छोटेखानी गाव आहे. भूस्खलनाने येथील लोक भयभीत झालेले आहेत. काही लोक भितीपोटी घरी जाण्यास धजावत नाहीत. गावातील घरांना धोका कायम असल्याने पुन्हा भूस्खलन झाल्यास आम्ही काय करायचे? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
 • कोंढरी गावच्या पुनर्वसनासाठी काही लोक जमीन देण्यासाठी तयार आहेत. तसा ठराव ग्रामपंचायतीने शासन व आमदार संग्राम थोपटे यांना सादर केला आहे.
  भारती कोंढाळकर, सरपंच कोंढरी वेणुपुरी ग्रामपंचायत
 • कोंढरी गावच्या पुनर्वसनासाठी विभागीय आयुक्‍ताकडे पाच प्रस्ताव सादर केले आहेत. ते या संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत.
  राजेंद्रकुमार जाधव, उपविभागीय अधिकारी, भोर
 • कोंढरी गाव निरादेवघर धरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त असून शासनाने त्यांचे पुनर्वसन फलटन तालुक्‍यात करण्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात शासनाने याची कोणतीही कारवाई केली नाही. पावासाचा जोर वाढत असल्याने डोंगर रानात पुन्हा भूस्खलन झाल्यास आम्ही काय करायचे. शासनाने आमचे तातडीने पुनर्वसन करावे.
  भिवबा पारठे, माजी सरपंच कोंढरी वेनुपुरी ग्रुप ग्रामपंचायत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)