Uday Samant : ‘मी बोलेन तेच खरं’ असा सत्तेचा अहंकार बाळगू नका! भाजपच्या बड्या नेत्यावर उदय सामंतांचा पलटवार
Uday Samant : भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना सूचक इशारा दिला.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उदय सामंत सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी वरील विधान केले.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांचा सन्मान राखण्याचे आवाहन करत उदय सामंत म्हणाले की, एखाद्या उमेदवाराला मोजकी मते मिळणार असली, तरी तो लोकशाही प्रक्रियेतील उमेदवार असतो. त्यामुळे त्याला कमी लेखणे किंवा त्याची अवहेलना करणे योग्य नाही.
पुढे बोलताना त्यांनी सत्तेच्या अहंकारावरही भाष्य केले. आपल्याकडे सत्ता आहे आणि आपण बोलू तेच योग्य, अशी भावना निर्माण होणे चुकीचे आहे. अशा प्रकारच्या अहंकारातूनच ‘गोकुळ होतं’, असा टोला त्यांनी जयकुमार गोरे यांना लगावला.
पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही भारत-पाकिस्तानमधील लढाई नसून मैत्रीपूर्ण लढत आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला कमी लेखू नये. निवडणुकीत काहीही घडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले होते?
भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्याबाबत बोलताना, ‘कोण सचिन सानप? मी त्यांना ओळखत नाही,’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावर उदय सामंत यांनी आक्षेप घेत प्रत्युत्तर दिले. जयकुमार गोरे यांना सचिन सानप यांची ओळख नसेल, तर येत्या २७ तारखेला सानप आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ते कोण आहेत, हे त्यांना कळेल, अशा शब्दांत सामंत यांनी निशाणा साधला.
महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याला उदय सामंत यांनी दिलेले प्रत्युत्तर आणि सत्तेच्या अहंकाराबाबत केलेले भाष्य यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.





