Pune District : निघोजेत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ

चिंबळी : निघोजे (ता. खेड) येथे गेल्या 19 वर्षांची परंपरा जतन करत या वर्षीही ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. 24) पासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला असून मंगळवारी (दि. 31) सांगता होणार आहे.
मंदिरात दररोज पहाटे पाच ते सात काकड आरती, महापूजा, सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 12 ते 1 गाथा भजन, दुपारी 1 ते 4 महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, रात्री 8 ते 10 कीर्तन सेवा व 10 नंतर हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
यामध्ये शेखर महाराज जांभुळकर, कुणाल जाधव, बाळशीराम मिंडे, विष्णू जगताप, गणेश फरताळे, सागर शिर्के, बाजीराव बागर यांची कीर्तन सेवा पार पडणार असून मंगळवारी (दि. 31) अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता निमित्त सकाळी 8 ते 10 ग्रंथ दिंडी सोहळ्याची टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढून 10 ते 12 समाधान महाराज शर्मा यांचे काल्याचे कीर्तन, महाप्रसाद आयोजित करून सांगता करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांचे आयोजन श्री भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट श्री भैरवनाथ देवस्थान, श्रीनाथ प्रासादिक दिंडी, पंच कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 30) रात्री 10 वाजता ग्रामस्थांच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.





