पुणे | बोपदेव घाट प्रकरणात आरोपीची डीएनए चाचणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी (दि.१२) दिले.
अटकेत असलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी तसेच डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (वय २०, रा. डिंडोरी, मध्य प्रदेश) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे.
बोपदेव घाटात ३ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयीन तरुणी आणि मित्राला कोयत्याचा धाक दाखविण्यात आला. आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणात पसार असलेल्या आरोपीला कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातून पोलिसांनी अटक केली.
अटकेत असलेल्या २५ वर्षीय आराेपीला शनिवारी पोलिसांनी न्यायलायात हजर केले.आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. अटक आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे, तसेच डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला कोयता आणि वाहन जप्त करायचे आहे. आरोपींनी पीडित तरुणीला धमकावून तिच्याकडील सोनसाखळी चोरली असून, ती जप्त करायची आहे, असे सहायक सरकारी वकील ॲड. विजयसिंह जाधव यांनी युक्तिवादात न्यायालयात सांगितले.
तसेच, बलात्कार प्रकरणातील आरोपी सराईत आहेत. अटकेत असलेल्या आरोपीचे साथीदार पसार झाले आहे. त्यांचा शोध घ्यायचा आहे. पसार झालेल्या आरोपींची माहिती घ्यायची आहे.
तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती ॲड. जाधव यांनी युक्तिवादात केली. न्यायलायाने आरोपीला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.



