बोनस न मिळाल्यास दूध उत्पादकांची दिवाळी होणार कडू?

विजय घोरपडे
नागठाणे – दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी दिवाळीला हमखास मिळणारा बोनस अर्थात परतावा या वर्षी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. या संदर्भात खाजगी व सहकारी दूध संघाच्या व्यवस्थापनांनी एकमेकांशी संधान बांधून गुप्त खलबतं केली असल्याची चर्चा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. यात व्यवस्थापन यशस्वी झाल्यास दुध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी कडू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागठाणे परिसरातील अनेक गावांमधून कराड येथील कोयना सहकारी दूध संघ, पाटणचा सकस दूध संघ, बोरगावचा ममता दूध संघ तसेच सांगली जिल्ह्यातील काही दूध संघ चिलींग सेंटरच्या माध्यमातून हजारो लिटर गाय, म्हैस दुधाचे संकलन करत आहेत. मागील काही वर्षांपासून शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन व्यवसाय या परिसरात अनेक शेतकरी करत आहेत. नोकऱ्यांच्या उपलब्ध संधी पाहता अनेक तरूणसुद्धा आता या दुग्ध उत्पादन क्षेत्रात उतरले आहेत. काहींनी तर आर्थिक महामंडळ, बॅंका, पतसंस्था यांच्या माध्यमातून कर्ज घेऊन छोट्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय करून कुटूंबाला आर्थिक हातभार लावू पहात आहेत. बाजारपेठेतील दुधाची मागणी व दुग्ध उत्पादनातील तफावत पाहता उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला रास्त भाव मिळणे अपेक्षित आहे.
दूध संघ चालकांचा गोरखधंदा
वर्षोनवर्ष कमी होणारे पर्जन्यमान, त्यामुळे होणारी पाणीटंचाई व त्यातून होणारी चाराटंचाई आता दूध उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरू लागली आहे. जनावरांना लागणाऱ्या चारा, पशुखाद्य व वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च, “वाढता वाढता वाढे’ या उक्ती प्रमाणे गगनाला भिडला आहे. पण त्या पटीत उत्पादित दुधाला मिळणारा भाव पाहता नफा व खर्चाची तोंडमिळवणी करताना उत्पादकांना नाकीनऊ येत आहे. अनेक वेळा यासाठी आंदोलने होत असतात पण शेतकऱ्यांच्या हाती फारसं काही लागल्याचं दिसत नाही. आधीच नोकऱ्या नाहीत, म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून केलेला हा व्यवसाय तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन करत भविष्यात काही तरी मिळेल या आशेवर शेतकरी व तरूण करत आहेत. कष्ट उपसून जिवंतपणी मढं झालेल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन दूध संघ चालकांचा गोरखधंदा मात्र जोमात सुरु आहे.
परतावा हडप करण्याच्या हालचाली
शेतकऱ्याने उत्पादित केलेले दूध स्थानिक संकलन सेंटरच्या माध्यमातुन सहकारी अथवा खाजगी दूध प्रक्रिया संघाला जाते. त्या संघांकडून 1 एप्रील ते 31 मार्च अशा आर्थिक वर्षात संघाला पुरवठा केलेल्या म्हैशीच्या दुधास प्रतिलिटर 80 पैसे, तर गाय दुधास 60 पैसे बोनस म्हणजेच परतावा देतात. अन् तसा आतापर्यंतचा प्रघात आहे. तो परतावा संकलन केंद्रांच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दिवाळीला वितरीत केली जाते. उत्पादकांना काही हजारात ही रक्कम मिळते. त्यावर त्याच्या कुटुंबाची दिवाळी गोड होते. पण यावर्षी हा परतावा हडप करण्याच्या हालचाली सुरु आहेत.
दुधाला अधिक दर दिल्याने बोनस देणार नसल्याचे कारण
संबंधित दूध संघ चालकांकडून याबाबत माहिती घेतली असता याआधी गायीच्या व म्हैशीच्या दुधाला अधिक दर दिल्याने बोनस देणार नसल्याचे कारण दूध संघ पुढे करत आहेत.
संकलन केंद्र चालकांना अडकवण्याची नामी शक्कल
गावोगावचे दुधसंकलन केंद्र चालक सहकारी अथवा खाजगी संघाला दुध पुरवठा करतात. दैनंदिन पुरवठा केलेल्या दुधाच्या रकमेतून प्रतिलिटर 1 रूपया संघ अनामत रक्कम म्हणून कापून स्वतःकडे ठेवतात. केंद्रचालकाला काही आर्थिक अडचण आल्यास अनामत रक्कमेतूनच काही रक्कम अदा करतात. पूर्ण रक्कम अदा न करता केंद्रचालकाकडून कापलेली रक्कम दीड ते दोन वर्ष संघ व्यवस्थापन बिनव्याजी वापरते. चुकुन संघ व केंद्रचालकांमध्ये बिनसलेच तरी अनामत रकमेपायी तो दुसरीकडे दुध पुरवठा करू शकत नाही. जर तो केंद्रचालक दुसरीकडे पुरवठा करू लागलाच तर त्याची कष्टाची अनामत रक्कम बुडवली जाते. एक प्रकारे अनामतरूपाने केंद्रचालकाला अडकवण्याची ही नामी शक्कल सर्वच संघांनी अवलंबलेली दिसुन येते.
बोनस द्या अन्यथा शेतकऱ्यांचे
आंदोलन पेलवणार नाही
नैसर्गिक संकटांवर मात करू पाहणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या परताव्यावर डोळा ठेऊन दूध संघानी चुकीचा निर्णय घेऊ नये. जे वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे. जे त्यांच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळालच पाहिजे. परताव्याची बोनसरूपी रक्कम हडप करून दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दिवाळीचा शिमगा करू नका. दूध संघांनी बोनसबाबत आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन जे आंदोलन करू ते दूध संघांना पेलवणार नाही.
राजु शेळके,जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा जिल्हा
================





