पुणे जिल्हा | श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या सभासदांची दिवाळी गोड

राहू, (वार्ताहर) – श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या सभासद व ऊस उत्पादक पुरवठादार शेतकर्यांच्या दृष्टीने यंदाची दिवाळी ही दुहेरी आनंदाची असणार आहे. कारण कारखान्याने आर्थिक वर्ष 2023-24 करिता सभासदांना 15 टक्के लाभांश देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी सांगितले. ही रक्कम संबंधित सभासदांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे दिवाळीकरिता माफक दरात साखर वाटप केली जाते. त्यानुसार चालू वर्षीही दिवाळी 2024साठी साखर वाटप धोरण जाहीर केलेले आहे. साखरेचे वितरण हे शेअर्सच्या रकमेनुसार तसेच हंगाम 2023-24 मध्ये गाळपास आलेल्या उसाच्या प्रमाणामध्ये अशा दोन्ही प्रकारे दिली जाणार आहे.
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी यांना येत्या दिवाळी करिता कारखाना कार्यक्षेत्रातील गट ऑफिसमध्ये दि. 14 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी साडेपाच या वेळेत प्रती किलो 20 रुपये या दराने साखर वाटप करण्यात येणार आहे.
कारखान्याच्या सभासद शेतकरी व ऊस पुरवठादार शेतकरी यांना कारखाना धोरणानुसार संबंधित गटामध्ये यादीनुसार साखर वाटप होणार आहे.
साखर वितरण व्यवस्था कारखाना कार्यक्षेत्रातील राहू, पारगाव (पारगाव, रांजणगाव गटाची) खामगांव, अष्टापूर फाटा (हवेली व खेड गेटकेन गटाची), तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर या शेतकी गट ऑफिसेसमध्ये चालू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे कारखान्याचे साखरेचे वाटप 10, 20, 50 किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे.
कार्यक्षेत्रातील उसाचे उत्पादन लक्षात घेता दि. 15 नोव्हेंबरपासून शासनाने साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या दृष्टीने हंगामाकरिता आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली आहे.
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे हंगाम 2024-25 साठी 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांचा ऊस नोंदीनुसार गाळपास आणणेचे नियोजन केलेले आहे. त्यासाठी लागणारी पुरेशी तोडणी-वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली आहे.-पांडुरंग राऊत, अध्यक्ष श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना


