पुणे जिल्हा : ऊस तोडणी ठप्प; चारा पिके भुईसपाट

राहू – राहू बेट परिसरात (दि.10)रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. सुमारे पाऊण तास मुसळधार तर नंतर अर्धा तास संततधार पाऊस झाला. या पावसाने कारखान्याला गाळपाला जाणाऱ्या उसाची तोडणी बंद राहण्याची शक्यता आहे.
राहू बेट परिसरात श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, व्यंकटेश कृपा या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी अनेक ऊस तोडणी मजुरांनी आपल्या तात्पुरत्या झोपड्या तयार केल्या आहेत. परंतु पडलेल्या मोठ्या पावसामुळे त्याच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने प्रकार झाले आहेत. उसाच्या फडात मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस तोडणी बंद राहण्याची शक्यता आहे.
ऊस तोडणी बंद राहिल्यामुळे ऊस तोडणीसाठी हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू शकते. दुसरीकडे शेतकरी काही प्रमाणात सुखावला असला तरी अनेक शेतकऱ्यांची ऊस तोड बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी चारा पिके भुईसपाट झाली आहेत. यामध्ये कडवळ, मका, हत्तीगवत आदी पिकांचा समावेश आहे.
अखेर निसर्गाने न्याय दिला
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये कारखान्याचा बाजारभाव जाहीर करण्याबद्दल चर्चा झडत होत्या. त्यामध्ये आंदोलन करण्यापासून ते ऊस तोड बंद करण्यापर्यंत चर्चा चालू होत्या. संपूर्ण राज्यात अनेक शेतकरी संघटनांनी त्यासाठी बंद पुकारला आहे. परंतु त्याचा परिणाम पुणे जिल्ह्यात तुलनेने कमी जाणवत होता. परंतु ही शेतकऱ्यांची कळकळ निसर्गानेच ऐकून निसर्गानेच तोडी बंद केल्याची चर्चा सध्या परिसरात चालू आहे. त्यामुळे एकीकडे ऊसतोड चालू होत असतानाच निसर्गानेच शेतकऱ्याला साथ दिली, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.





