Diwali Fire : दिवाळीमध्ये आगीच्या १४ घटनांची नोंद ; रावेतमध्ये बंद फ्लॅटमध्ये फटाक्यांमुळे लागली आग

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – दिवाळीच्या सणामध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांमुळे आग लागतात. १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी पाच वाजेपर्यंत आगीच्या १४ घटना घडल्याची नोंद अग्निशामक विभागाकडे आहे. तर रावेतमधील बंद असलेल्या फ्लॅटमध्ये फटाक्यांमुळे आग लागली. मात्र अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला.गेल्या दोन वर्षांत दिवाळी सणाच्या काळात १७३ आगीच्या घटनांची नोद आहे. घटनास्थळी लवकर जाता यावे, यासाठी अग्निशामक विभागाने मायक्रो प्लॅनिंग केले आहे.
मात्र १७ ते २० ऑक्टोबर या कालावधीत फटाक्यांमुळे १७ ठिकाणी आग लागल्याची नोंद अग्निशामक विभागाकडे आहे. मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत असल्यामुळे घटनास्थळी लवकर जाऊन आग शमविण्यासाठीचे १९ बंब रस्त्यावर ठिकठिकाणी तैनात केले आहेत.रविवारी (दि. १९) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास रावेत येथील स्वस्तिक ड्रीम्स सोसायटी, चंद्रभागा कॉर्नर, साई प्लॅटिना समोर एका फ्लॅटच्या गॅलरीत अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने फ्लॅटमधील सर्व रहिवाशी गावी गेल्याने जीवितहानी टळली असून, अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
प्राधिकरण उप अग्निशमन केंद्राला रात्री १०:३७ वाजता आगीची माहिती प्राप्त झाल्यावर तत्काळ एक अग्निशमन वाहन व पथक घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांनी पाहिले असता, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीमधून मोठ्या प्रमाणात धूर व ज्वाला निघत होत्या.या फ्लॅटचे मालक मिलिंद काटे व भाडेकरू शिवम तांबे हे दोघेही सध्या गावी असल्याचे समजले. त्यामुळे फ्लॅट आतून लॉक होता.
जवानांनी प्रथम एमएसईबी लाईट बंद असल्याची खात्री करून, सोसायटी पार्किंगमधून होजरील होजच्या साहाय्याने पाण्याचा मारा सुरू केला. आग काहीशी कमी झाल्यानेही धूर कायम असल्याने फ्लॅटमध्ये प्रवेश करणे आवश्यक ठरले.त्यानंतर पोलीस आणि मालक-भाडेकरूंच्या दूरध्वनी परवानगीने ग्राइंडरच्या साहाय्याने फ्लॅटचा दरवाजा उघडण्यात आला. जवानांनी आत जाऊन गॅलरीतून उर्वरित ज्वाळा पूर्णपणे विझवल्या. या आगीत फ्रिजचा पुठ्ठा बॉक्स, वॉटर बॉटल्स, प्युरिफायर बॉक्स कव्हर, कपडे सुकवण्याचे स्टँड, गव्हाची पोती (अंदाजे १० किलो), आणि इतर काही घरगुती साहित्य जळून खाक झाले.





