Diwali 2026: यंदा लक्ष्मी पूजन ८ की ९ नोव्हेंबरला? पूजनाबाबत विविध मतप्रवाह
पंचांगकर्त्यांकडून शास्त्रसंमत मुहूर्तावर शिक्कामोर्तब

पिंपरी – दिवाळीतील अत्यंत महत्त्वाच्या लक्ष्मीपूजनाच्या तारखेबाबत शहरवासीयांमध्ये असलेला संभ्रम अखेर मिटला आहे. पंचांगांमधील वेगवेगळ्या उल्लेखांमुळे ८ की ९ नोव्हेंबर यावरून नागरिकांत चर्चा रंगली होती.
मात्र, तिथी आणि प्रदोष काळाचा विचार करता यंदा रविवार, (दि. ८ नोव्हेंबर) रोजीच लक्ष्मीपूजन करणे शास्त्रशुद्ध ठरेल, असा निर्वाळा पंचांगकर्ते व ज्योतिषांनी दिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना पूजनाचे नियोजन करणे आता सोपे होणार आहे.
दिवाळी सणाचा मुख्य दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन. यंदा तारखेच्या गणितामुळे पूजनाबाबत विविध मतप्रवाह समोर येत होते. मात्र, धर्मशास्त्रानुसार लक्ष्मीपूजनासाठी प्रदोष व्यापिनी अमावस्या ग्राह्य धरली जाते. हा योग रविवारीच जुळून येत असल्याने ८ नोव्हेंबर हाच दिवस पूजनासाठी सर्वोत्तम ठरवण्यात आला आहे.
अमावस्या तिथीची वेळ
पंचांगानुसार, रविवार (दि. ८) रोजी सकाळी ११ वाजून २७ मिनिटांनी चतुर्दशी संपून अमावस्या सुरू होईल. ही तिथी सोमवार (दि. ९) दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहील. अमावस्या दोन्ही दिवशी येत असली, तरी रविवारी सायंकाळी अमावस्या असल्याने याच दिवशी पूजन विहित मानले गेले आहे.
प्रदोष काळ आणि स्थिर लग्न महत्त्वाचे
शास्त्रात लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळचा प्रदोष काळ अत्यंत शुभ मानला जातो. या वेळेत स्थिर वृषभ लग्न असल्यास लक्ष्मी घरात चिरकाल वास करते, अशी धार्मिक धारणा आहे. त्यामुळे सोमवारी दुपारनंतर अमावस्या संपत असल्याने रविवारी सायंकाळीच स्थिर लग्नात देवीची आराधना करणे श्रेयस्कर ठरेल.
लक्ष्मी, कुबेर आणि श्रीगणेश पूजन
या दिवशी महालक्ष्मीसह समृद्धीचे प्रतीक असलेले कुबेर आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे मनोभावे पूजन केले जाते. उद्योग, व्यवसाय आणि घराघरांत सुख-समृद्धी नांदावी यासाठी दीपप्रज्वलन केले जाते. पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि औद्योगिक पट्ट्यातील बाजारपेठांमध्ये आतापासूनच या पूजनाची लगबग सुरू झाली आहे.
Pune Bar Association: न्यायाधीश डायस, लॉनवर ; मग वकील, पक्षकार वेठीस का?





