Pune Bar Association: न्यायाधीश डायस, लॉनवर ; मग वकील, पक्षकार वेठीस का?
Pune Bar Association:

पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष काळुराम भुजबळ यांचा सवाल
Pune Bar Association: सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने वकील, पक्षकारांनी गांभीर्याने घेतला. सूचनेनुसार ते न्यायालयाच्या बाहेरही गेले. मात्र, न्यायालयामध्ये न्यायाधीश मंडळी डायसवरती बसून कामकाज करत असल्याचे आम्हाला जाणवले.
काही न्यायाधीश लॉनवरती आहेत. यावरून असे वाटतय की आलेल्या ई-मेलमध्ये खरेच तथ्य आहे का? जर तथ्य नसेल, तर वकील आणि पक्षकारांना वेठीस का धरले, असा प्रश्न पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. काळुराम भुजबळ यांनी उपस्थित केला.
सुरक्षिततेचा विचार केला, तर संपूर्ण इमारतीची भिंत मेट्रोच्या कामामुळे पाडण्यात आलेली आहे. याला बराच कालावधी गेला आहे. २८ सप्टेंबरला आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) ही भिंत बांधण्यासाठी अर्ज केला आहे. मेट्रोनेही याकडे दुर्लक्ष केले आहे.
न्यायालयातील १०० पैकी ८० सीसीटीव्ही बंद आहेत. वर्षानुवर्षे न्यायालयातील लिफ्टच्या विषयाकडेही पीडब्ल्युडी दुर्लक्ष करत आहे. आजच्या घटनेतनंतर पक्षकारांची अशी अवस्था आहे, की चार वाजलेत, आम्ही सहा वाजेपर्यंत थांबायचं की जायचं? आता यासंदर्भात प्रशासनाने अनधिकृत कळविलेले नाही.
किमान पुणे बार असोसिएशनला कळविणे अपेक्षित होते. येत्या १० ते २० दिवसांमध्ये न्यायालयाची भिंत, सीसीटीव्हीसह उर्वरित प्रश्न मार्गी लावावेत; अन्यथा पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाला आम्ही सरळ टाळे लावू, असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे.





