Nagar | बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबाबत दिव्यांग करणार उपोषण

नगर,(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्राना प्रतिबंध घालावा, या मागणीसाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, अनामप्रेम, आकांक्षा उद्योगालय, दिव्यदृष्टी संस्थाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. अन्यथा येत्या ९ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी संघाचे अध्यक्ष नितीन सोनार, उपाध्यक्ष किशोर हडोळे, महासचिव श्रीकांत माचवे, सचिव सोमनाथ दरंदले, कौस्तुभ पराई, अनामप्रेमचे रामेश्वर फटांगडे, अभय रायकवाड, उमेश पंडुरे, सचिन गारदे, राहुल खिरोडे, अक्षयकुमार राउत, अमृत भुसारी आदीसह दिव्यांग उपस्थित होते.
शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तीना प्रमाणपत्र जारी करण्याचे अधिकार जिल्हा रूग्णालयाला आहे. ज्यांना अंपगत्व नसताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी बनावट अपंग प्रमाणपत्र शोधून ती तात्काळ रद्द् करावीत. जे दिव्यांग आहेत त्यांनाच शासकीय सोयीसुविधा मिळाव्यात.
अपंग प्रमाणपत्रात पारदर्शकता आणावी. ज्यांच्याकडे बनावट प्रमाणपत्र आढळून आले आहेत त्यांच्यावरकारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. अन्यथा (दि. ९) ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.





