Divya Deshmukh : दिव्या देशमुखच्या शिरपेचात मानाचा तुरा; अर्जुन पुरस्कारासाठी झाली निवड
नागपूरच्या एका डॉक्टर कुटुंबात जन्मलेल्या दिव्या देशमुखने (Divya Deshmukh) वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी बुद्धिबळाच्या पटावर पाऊल ठेवले आणि एका ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात झाली.

Divya Deshmukh : अवघ्या पाचव्या वर्षी बुद्धिबळाच्या ६४ घरांशी मैत्री करणाऱ्या नागपूरच्या एका चिमुरडीने (Divya Deshmukh) जागतिक पटावर असा काही डाव मांडला की संपूर्ण जगाचे डोळे तिच्या चालींवर खिळून राहिले.
वैद्यकीय क्षेत्रातील कौटुंबिक पार्श्वभूमी बाजूला ठेवून स्वतःचा वेगळा मार्ग निवडणाऱ्या दिव्या देशमुखने बालवयातील राष्ट्रीय अंडर-७ विजयापासून सुरू केलेली ही घोडदौड थक्क करणारी ठरली.
२०१४ मध्ये अंडर-१० आणि २०१७ मध्ये अंडर-१२ जागतिक विजेतेपदे पटकावल्यानंतर तिने (Divya Deshmukh) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचा दरारा निर्माण केला. २०२१ मध्ये वुमन ग्रँडमास्टर, २०२२ मध्ये भारतीय महिला अजिंक्यपद आणि २०२३ मध्ये आशियाई महिला अजिंक्यपदासह इंटरनॅशनल मास्टरचा किताब मिळवत ती पुढे सरकत राहिली. २०२४ मध्ये तर तिने अंडर-२० जागतिक ज्युनियर स्पर्धेत ११ पैकी १० गुणांची जबरदस्त कमाई करत अजिंक्य राहत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
२०२४ चे वर्ष तिच्या कारकिर्दीला एका ऐतिहासिक वळणावर घेऊन गेले. बुडापेस्ट येथे रंगलेल्या ४५व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला, ज्यामध्ये दिव्याचा वाटा सर्वाधिक निर्णायक ठरला. तिसऱ्या पटावर सर्व ११ सामने खेळत तिने एकही पराभव पत्करला नाही आणि २६०८ च्या थक्क करणाऱ्या रेटिंगसह वैयक्तिक सुवर्णपदकही आपल्या नावावर केले.
यानंतर २०२५ मध्ये जॉर्जियातील बातुमी येथे पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकात दिव्याने (Divya Deshmukh) आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चमत्कार घडवला. तीन दिवस चाललेल्या अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिने भारताची अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिचा टायब्रेकरमध्ये पराभव करत जगज्जेतेपदाचा मुकुट परिधान केला.
या ऐतिहासिक विजयासह दिव्या महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली, भारताची ८८वी ग्रँडमास्टर व ही पदवी मिळवणारी चौथी भारतीय महिला बनली, तसेच तिने थेट २०२६ च्या महिला कॅंडिडेट्स स्पर्धेचे तिकीटही पक्के केले. तिच्या या अतुलनीय प्रवासाचा सन्मान करत केंद्र सरकारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ अंतर्गत बुद्धिबळपटू विदित गुजराथीसह दिव्या देशमुखला मानाचा ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर केला आहे.
नागपूरच्या दिव्याची सुवर्णभरारी!
नागपूरच्या एका डॉक्टर कुटुंबात जन्मलेल्या दिव्या देशमुखने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी बुद्धिबळाच्या पटावर पाऊल ठेवले आणि एका ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात झाली. कुटुंबाचा वैद्यकीय वारसा बाजूला ठेवून तिने ६४ घरांच्या खेळात स्वतःचे भविष्य घडवण्याचा धाडसी निर्णय घेतला.
वयाच्या सातव्या वर्षी राष्ट्रीय अंडर-७ चे जेतेपद पटकावून तिने आपल्यातील प्रतिभेची पहिली झलक दाखवली. त्यानंतर जागतिक युवा स्पर्धांमध्ये विजयांची मालिका रचत तिने आंतरराष्ट्रीय पटावर स्वतःचे नाव कोरले.
दिव्याची घोडदौड केवळ वयोगट स्पर्धांपुरती मर्यादित राहिली नाही. तिने २०२१ मध्ये वुमन ग्रँडमास्टर, २०२२ मध्ये भारतीय महिला अजिंक्यपद आणि २०२३ मध्ये आशियाई महिला अजिंक्यपदासह इंटरनॅशनल मास्टरचा किताब मिळवत वरिष्ठ गटातही आपला दरारा निर्माण केला.
बालवयातील स्पर्धांपासून सुरू झालेला हा प्रवास ज्युनियर विश्वविजेतेपद, ऑलिम्पियाड सुवर्णपदक आणि अखेर महिला विश्वचषकाच्या ऐतिहासिक जगज्जेतेपदापर्यंत पोहोचला. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी जागतिक बुद्धिबळावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिव्याच्या (Divya Deshmukh) याच अद्वितीय यशावर आता ‘अर्जुन पुरस्कारा’च्या रूपाने देशाने सर्वोच्च मोहर उमटवली आहे.






