पुणे – लग्नानंतर सात वर्षाच्या कालावधीत शरीर संबंध न ठेवणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. शरीर संबंध न ठेवणे ही एक प्रकारची क्रुरता असल्याचा निष्कर्ष काढत घटस्फोट मंजुर केला. वैद्यकीय तपासणीनंतर दोष असल्याने पती शरीर संबंध ठेवू शकत नसल्याचे स्पष्ट झाल्याचे म्हणणे पत्नीने दाखल केले होते. घटस्फोटानंतर तिला दरमहा सात हजार रुपये पोटगी देण्याचा आदेशही दिला आहे.
माधव (वय ३७) आणि माधवी (वय २७) अशी दोघांची नावे आहेत. माधवीतर्फे ॲड. विकास शरद मुसळे यांनी न्यायालयात बाजू मांडली. माधव शिक्षक आहे. तर ती गृहिणी आहे.मे २०१४ मध्ये परंपरेनुसार पाहणी करून दोघांचा विवाह झाला. माधवने पहिल्या रात्री शरीर संबध ठेवण्यासाठी कोणत्यातरी गोळ्या घेतल्या. मात्र, ते संबंध प्रस्थापित करू शकले नाहीत. त्यानंतर संबंध ठेवण्यासाठी त्यांनी कधीच पुढाकार घेतला नाही.
याऊलट माधवीला न सांगता तो भजन आणि कीर्तन करायला जात असे. याबाबत विचारणा केली असता, संसारात रस नसून, सन्यास घेणार असल्याचे तो सांगायचा. नोकरीवर नियमित जात नव्हता. त्यामुळे तो निलंबित झाला होता. त्या काळात सहा महिने तिला माहेरी ठेवले. त्यानंतर रुजू झाल्यानंतर तो तिला घेऊन गेला. मात्र, वागणे पूर्वीप्रमाणेच होते.
आजूबाजूच्या लोकांना घरी बोलावून भजन, कीर्तन करीत असे. मात्र, मुलबाळ होत नसल्याने नातेवाईक, मित्रमंडळी विचारणा करायची. तेव्हा तिच्यातच दोष असल्याचे तो सांगायचा. मात्र, घरच्यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास भाग पडल्याने तो शरीर संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तरीही तिला संसार करायचा होता. तिने उपचार करण्याचा सल्ला त्याला दिला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने न्यायालयात दावा दाखल केला. तेथे तो वकिलामार्फत हजर राहिला. मात्र, कैफियत मांडली नाही.
“विवाहानंतर शरीर संबंध न ठेवणे, ही क्रुरताच आहे. या मुद्द्यावर दाखल केलला घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने मंजुर केला.” – ॲड. विकास शरद मुसळे, पत्नीचे वकील.