लोणीकंद, (वार्ताहर) – महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असताना पुणे जिल्ह्यातील बारामती पाठोपाठ बहुचर्चेत असलेल्या शिरूर-हवेली मतदार संघातील लढतीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. औद्योगिकीकरणामुळे जगाच्या कानाकोपर्यात पोहोचलेल्या शिरूर-हवेली मतदार संघाची धुरा सध्यातरी विद्यमान आमदार अशोक पवार यांच्याकडे आहे. महविकास आघाडीमध्ये या मतदार संघाची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाली तर अशोक पवार हेच उमेदवार असल्याने पवारांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मतदार संघात गावभेट दौरा घेत आश्वासक, भावनिक पत्रक वाटप करण्यात मतदारांचा आशीर्वाद घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यात शरद पवार गटात आमदार अशोक पवार हे एकमेव एकनिष्ठ आमदार असल्याने ते महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार समजत असले तरी महविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी मतदार संघातील नागरिकांना मोफत महाकाल दर्शन घडवल्याने शिरूर हवेलीतील जनतेचा विशेषतः महिला वर्गाचा कटके यांच्याकडे चांगलाच कल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरळ साधा स्वभाव, रेल्वे मध्ये मतदार संघातील नागरिकांसोबत स्वतः रेल्वेच्या डब्यात झोपलेले कटके, शिरूर तालुक्यात शेतकर्याच्या गोठ्यात जाऊन गाईची धार काढणारे कटके यांच्या व्हिडिओने शिरूर-हवेलीमध्ये त्यांची चांगलीच चर्चा रंगल्याने महाविकास आघाडीमध्ये पवार आणि कटके यांमध्ये कोणाला जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोघेही पूर्ण ताकदीने विधानसभेच्या तयारीने रणांगणात उतरले आहेत. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये शिरूर हवेलीची जागा आपल्या पक्षाला मिळण्यासाठी प्रयत्नात असलेले अशोक पवार आणि माऊली कटके तर दुसरीकडे महायुतीतून भाजपकडून संपूर्ण ताकदीनिशी तयारीत असलेले प्रदीप कंद व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शांताराम कटके हे तयारीत आहे. शिरूर तालुक्याच्या सहकाराचा कणा घोडगंगा साखर कारखाना नजरेसमोर ठेवून महायुतीचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार प्रदीप कंद, शांताराम कटके, दादा पाटील फराटे, राहुल पाचर्णे यांनी शिरूर तालुक्यात पायी यात्रा काढत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याला काहीअंशी ठराविक गावांम1ध्ये प्रतिसाद देखील मिळाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे हवेली तालुक्यात अजित क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेला लाखोंची बक्षीस ठेवत शांताराम कटके यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचे शांताराम कटके हे दावेदार असल्याचे दाखवल्याने शिरूर-हवेली च्या लढतीत नक्की बाप्पू दादा की आबा हे अता काही दिवसांतच जागावाटप जाहीर झाल्यानंतर समजणार असल्याचे दिसत आहे.